प्रशांत चंदनखेडे वणी :-
घरासमोरील रस्त्यावर बैलबंडी ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेला व तिच्या पतीला मारहाण करून धमकी दिल्याची घटना मुक्टा (ता. मारेगाव) येथे रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वर्षा दिलीप भोंग (वय ३९, रा. मुक्टा) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती घरात असताना घरासमोरील रस्त्यावर नेहमीप्रमाणे बैलबंडी ठेवलेली होती. यावरून शेजारी राहणाऱ्या आरोपींनी जागा अडवल्याचा आरोप करत शिवीगाळ सुरू केली. वाद चिघळल्याने आरोपी चंद्रकांत यांनी फिर्यादीच्या पतीचा गळा पकडून मारहाण केल्याचे तसेच फिर्यादी महिलेलाही हाताबुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच आरोपी घनश्याम याने शेताच्या रस्त्यावर भेटल्यास पाहून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, गीता ढवस यांनीही वादात सहभागी होत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत वर्षा दिलीप भोंग (वय ३९, रा. मुक्टा) यांच्या तक्रारीवरून आरोपी घनश्याम सुर्यभान ढवस (५५), चंद्रकांत घनश्याम ढवस (२६) आणि गीता घनश्याम ढवस (५०) सर्व रा. मुक्टा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पो.शि. सागर दिपेवार करत आहेत.
गावातील किरकोळ कारणांवरून वाढणारे वाद कायदा-सुव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

No comments: