सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि व्यवस्थापनदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सहकार प्रशिक्षण शिबिर’ रविवारी वणी येथे उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ आणि श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनिंग हॉल येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बदलत्या काळात सहकाराची नव्याने मांडणी
कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि जबाबदारीची जाणीव या त्रिसूत्रीवर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले.
उद्घाटनपर भाषणात कोयटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सहकार हा केवळ व्यवहाराचा विषय नसून विश्वासाची चळवळ आहे. विश्वास टिकवण्यासाठी व्यवस्थापन काटेकोर आणि पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे.” पतसंस्थांच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि लेखापरीक्षणातील शिस्त ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तज्ज्ञांकडून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
दिवसभर विविध विषयांवर सत्रे पार पडली. निधी नियोजन, कर्जवाटपातील जोखीम, थकबाकी नियंत्रण आणि संचालक मंडळाची धोरणात्मक भूमिका यावर सखोल चर्चा झाली.
यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे तज्ज्ञ संचालक प्रा. कवडूजी नगराळे यांनी निधी व्यवस्थापनातील अचूक नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. तर धनंजय तांबेकर यांनी संचालक मंडळाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत संस्थेच्या दीर्घकालीन विकासासाठी ठोस धोरणांची आवश्यकता स्पष्ट केली.
सहकारातील शिस्तीवर भर
श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सहकार चळवळीतील शिस्त, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार केला. “सहकार क्षेत्र हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याची विश्वासार्हता टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
या शिबिरात श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळातील परीक्षित एकरे, पुरुषोत्तम बद्दमवार, लिंगारेड्डी अंडेलवार, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, रमेश भोगळे, सुरेश बरडे, अॅड. घनश्याम निखाडे, डॉ. भुपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, उदय रायपुरे, अरविंद ठाकरे, सुनिल देठे, छायाताई ठाकूरवार, निमाताई जीवने आदी उपस्थित होते. तसेच राजुदास जाधव, शांतीलाल शिंगी, दादाराव तुपकर आणि सुदर्शन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुबक संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संचालक परीक्षित एकरे यांनी पतसंस्थेतील सर्वांचे आभार मानले.
या शिबिरात वणी तालुक्यातील विविध पगारदार व नागरी सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि संचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
एकूणच, व्यवस्थापन कौशल्ये, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त या तिन्ही अंगांनी सहकार चळवळीला बळकटी देणारे हे शिबिर दिशादर्शक ठरले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



No comments: