Latest News

Latest News
Loading...

कवी विनोदकुमार आदे यांच्या ‘बाप’ कवितासंग्रहाचे प्रकाशन; बापाच्या त्यागाला शब्दरूप


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील शेतकरी मंदिर येथे आयोजित माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात कवी तथा साहित्यिक विनोदकुमार आदे यांच्या ‘बाप’ या कवितासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला अभिनेते तथा सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांची विशेष उपस्थिती लाभली.

तसेच या कार्यक्रमात साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. ‘बाप’ या विषयाला साहित्यविश्वात तुलनेने कमी स्थान मिळाले असले तरी या कवितासंग्रहातून कवी आदे यांनी बापाच्या त्याग, कष्ट आणि संघर्षमय जीवनाचे प्रभावी चित्रण केले आहे.

विनोदकुमार आदे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याने पुस्तकाची मुखपृष्ठ रचना, आतील रेखाचित्रे, ग्राफिक्स तसेच टंकलेखन ही सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःच पार पाडली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी पुस्तकाच्या ब्लर्बमधून बापाच्या त्यागाला जिवंत शब्दांत अभिव्यक्ती दिली आहे.

या प्रसंगी वक्ते दत्ता डोहे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बापाच्या स्वभावात असणाऱ्या महापुरुषांच्या गुणांचे दर्शन कवी विनोदकुमार आदे यांच्या लेखणीतून घडते. त्यांच्या कवितांमध्ये कष्ट, स्वाभिमान, करुणा आणि संघर्षाचे वास्तव दर्शन होते.” त्यांनी या कवितासंग्रहात बुद्धांची करुणा, कबीरांची कष्टमूल्ये, तुकोबांचे निसर्गाशी असलेले नाते, शिवरायांच्या पराक्रमाचा आदर्श आणि डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षाचं प्रतिबिंब काव्य रूपात मांडलं आहे, असेही ते म्हणाले.

‘बाप’ या कवितासंग्रहातून कवीने वडिलांच्या कष्टमय आयुष्याचा, कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचा आणि मुलांच्या भविष्याकरिता झटणाऱ्या बापाच्या भावविश्वाचा हृदयस्पर्शी वेध घेतला आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह वाचकांच्या मनाला भिडणारा ठरत असून उपस्थित साहित्यप्रेमींनीही त्याचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रात ‘बाप’ या विषयावर नव्या दृष्टिकोनातून विचार मांडणारा हा कवितासंग्रह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.