प्रशांत चंदनखेडे वणी :-
मालवाहू रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ मार्चला रात्री १२.२० वाजताच्या सुमारास वणी-माजरी रेल्वे मार्गावरील नायगाव गावाजवळ घडली. रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडला, की तरुणाने रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मृतक तरुणाचे नाव अद्वैद विजय माळीकर वय अंदाजे २४ ते २५ वर्षे रा. विद्या नगरी, नांदेपेरा रोड असल्याचे समजते. मृतकाचे वडील शिक्षक असल्याचे सांगण्यात येते. घटनेच्या दिवशी माळीकर कुटुंबीय मोठ्या मुलाच्या उपचाराकरिता नागपूर येथे गेले होते.
शुक्रवारी रात्री वणी वरून चंद्रपूर विद्युत प्रकल्पासाठी (सिटीपीएस) कोळसा भरून जात असलेल्या मालवाहू रेल्वेची तरुणाला जोरदार धडक बसली. या अपघातात तरुण जागीच ठार झाला. तरुण हा रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्याच्या शरीराचा कंबरेपासूनचा भाग वेगळा झाला होता. हा तरुण अचानक रेल्वे समोर आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरुण रेल्वेखाली आल्याचे लक्षात येताच लोको पायलटने रेल्वे थांबवून घटनेची माहिती वणी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर यांना दिली.
त्यानंतर ही माहिती रेल्वे पोलीस (RPF) व वणी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक तरुण हा वणी बसस्थानकासमोर टी-स्टाल चालवायचा, असे सांगण्यात येते. त्याच्या मोठ्या भावाचा अपघात झाल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होते. त्यामुळे माळीकर कुटुंब हे नागपूर येथे जाऊन होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ वणीला परतले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अंकुश वडतकर करीत आहे.


No comments: