रविनगरमध्ये महिला दिनाचा उत्साह; झुंबा योगा ग्रुपच्या उपक्रमांनी महिलांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
महिलांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या कलागुणांचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करणारा जागतिक महिला दिन रविनगर येथे झुंबा योगा ग्रुपच्या वतीने यंदाही उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम आकर्षक ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा विद्या आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संचिता नगराळे तसेच ग्रामगीताचार्य विजया दहेकर उपस्थित होत्या. व्यासपीठावर झुंबा योगा ग्रुपच्या किरण नळे, साधना गोहोकार, भावना पोटदुखे, उमदा शेंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना विद्या आत्राम यांनी महिलांच्या सामाजिक प्रवासाचा वेध घेत सांगितले की, एक काळ असा होता की महिलांना केवळ घराच्या चौकटीतच मर्यादित ठेवले जात होते. मात्र महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान हक्क देणारी कायदेशीर तरतूद केली. या सामाजिक क्रांतीमुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करताना दिसत आहेत. शिक्षण, प्रशासन, उद्योग, क्रीडा किंवा कला—असे कोणतेही क्षेत्र आज महिलांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. संचिता नगराळे यांनी महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. कुटुंब आणि समाजाची जबाबदारी पार पाडताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
झुंबा योगा ग्रुपच्या किरण नळे यांनी आपल्या मनोगतात कुटुंबातील एकोपा टिकवून ठेवण्यात महिलांची भूमिका अधोरेखित केली. आज समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध जपणे, प्रेम व आपुलकी जपणे आणि परिवाराला एकत्र ठेवणे ही मोठी जबाबदारी महिलांनी पार पाडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजया दहेकर यांनीही महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे प्रेरणादायी विचार मांडले.
उद्घाटनानंतर महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार सुरुवात झाली. महिलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे वयाची साठी ओलांडलेल्या महिलांनीही उत्साहाने नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी मनसोक्त थिरकत आपल्या आनंदाला मुक्त अभिव्यक्ती दिली. तरुणींनाही लाजवेल अशा आत्मविश्वासपूर्ण अदा गृहिणी महिलांनी सादर केल्या. काही महिलांनी नाटकाचे प्रभावी सादरीकरण केले, तर काहींनी मिमिक्री, फॅन्सी ड्रेस आदी कलागुणांचे दर्शन घडवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सुषमा पाटील, पुष्पा कुलसंगे आणि शोभा हेपट या वयाची साठी पार केलेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विविध खेळांच्या स्पर्धांतील विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली, तर सहभागी सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुंदर संचालन छाया बुटले यांनी, तर आभार प्रदर्शन कुंदा कुमळवार यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झुंबा योगा ग्रुपच्या सर्व महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने, आनंदी वातावरणाने आणि एकोप्याच्या भावनेने सजलेला हा महिला दिनाचा सोहळा रविनगर परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला




No comments: