उन्हाळा सुरु झाल्यानंतर उष्णतेचे चटके जाणवू लागले असतांनाच मंगळवारी रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. उन्हाचा पारा वाढत असतांना अचानक पडलेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन उष्णतेच्या दाहकतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परंतु अनपेक्षितपणे पडलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दिवसभर उष्णतेची तीव्रता जाणवत असताना रात्री अचानक वातावरणात बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले. त्यानंतर वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीजपुरवठा उशिरापर्यंत सुरळीत न झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहनचालकांसह पादचारी नागरिकांचीही धावपळ सुरु झाली. काही क्षणातच रस्ते ओसाड झाले. नागरिक लगबगीने आपापल्या घरी परतले. भर उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाल्याने निसर्गाच्या अनिश्चिततेची पुन्हा एकदा प्रचिती आली.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका शेती क्षेत्रालाही बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेल्या रब्बी पिकांना विशेषतः गहू, हरभरा व मुग या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात कोणतीही मोठी पडझड नोंदवली गेली नसली, तरी अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांना चांगलेच हैराण केले. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवसांबाबतही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

.jpeg)
No comments: