Latest News

Latest News
Loading...

पाथरी गोवारी येथे व्हॉलीबॉल स्पर्धा थाटात संपन्न; दिवस-रात्र सामन्यांना खेळाडूंचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जय बजरंग क्रीडा मंडळ, पाथरी गोवारी यांच्या वतीने दिवस व रात्रकालीन खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. १६ व १७ मार्च अशा दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या विभागीय अध्यक्षा (अमरावती) तथा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातून शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे सांगून सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उबाठा ) तालुका सचिव राजेंद्र इददे, उपसरपंच संध्या बोर्डे, शिवसेना महिला तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे, सौ. झोडे, सौ. ढवस यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक चरणदास बोर्डे, सतीश घुंगरूड, उत्तम बोर्डे, रवींद्र बोर्डे, मनोज मडावी, प्रफुल बोर्डे आदींची उपस्थिती लाभली.

या स्पर्धेत परिसरातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेला क्रीडाप्रेमींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजेंद्र इददे यांनी केले.

या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रीडापटूंना एक उत्तम व्यासपीठ मिळाले असून गावात क्रीडासंस्कृतीला चालना मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.


No comments:

Powered by Blogger.