प्रशांत चंदनखेडे वणी :-
राष्ट्रीय लोकअदालतीच्या प्रभावी माध्यमातून थकीत कर्ज वसुलीत श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी (जि. यवतमाळ) यांनी भक्कम कामगिरी बजावली आहे. दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आयोजित लोकअदालतीत संस्थेच्या २१ शाखांपैकी १५ शाखांतील २३३ थकीत कर्ज प्रकरणांचा निपटारा करून तब्बल ६ कोटी ३० लाख ४८ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
या लोकअदालतीत कर्जदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन तडजोडीतून कर्जाची परतफेड केली. कर्जदारांवर अनेक वर्षांपासून थकीत असलेले कर्ज लोकअदालतीच्या माध्यमातून फेडण्यात आल्याने शेकडो कर्जदार कर्जमुक्त झाले आहेत. लोकअदालतीला कर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने थकबाकी कर्जाची तब्बल २३३ प्रकरणे निकाली निघाली असून यातून संस्थेच्या तिजोरीत ६.३० कोटी एवढी रक्कम जमा झाली आहे.
तडजोडीच्या मार्गाने प्रकरणे निकाली काढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ व खर्चाची बचत झाली असून अनेक कर्जदारांना कायदेशीर कचाट्यातून दिलासा मिळाला आहे. थकबाकीची जबाबदारी पूर्ण करत आर्थिक शिस्त प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने २३३ कर्जदारांनी या संधीचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्याधिकारी संजय दोरखंडे यांच्या मार्गदर्शनात ही थकबाकी कर्ज वसुली मोहीम राबविण्यात आली. शाखा व्यवस्थापक प्रवीण नांदे, अमोल मांडवकर, अमोल काळे, संतोष गुगल, दिनेश झाडे, अभिजीत देठे, विलास बोबडे, अनिल वगारे, प्रज्ञा टोंगे, अभय काकडे यांच्यासह वसुली पथक व कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
लोकअदालतीच्या माध्यमातून वाद टाळून तडजोडीने आर्थिक प्रश्न मार्गी लावण्याचा मार्ग अधिक परिणामकारक ठरत असल्याचे या कामगिरीतून अधोरेखित झाले असून सहकार क्षेत्रात संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


.jpeg)
No comments: