Latest News

Latest News
Loading...

झरी येथे महिला इफ्तार पार्टी; शिवसेना उबाठा व एकवीरा महिला पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम

प्रशांत चंदनखेडे वणी :-

रमजान महिन्याच्या पवित्र पर्वावर झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला इफ्तार पार्टीने महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा प्रभावी संदेश दिला. शिवसेना (उबाठा) पक्ष आणि एकवीरा महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

१४ मार्चला संपन्न झालेल्या या कार्यक्रमात एकविरा महिला पतसंस्था व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुनंदा गुहे, महिला तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे, शहर संघटिका डॉ. सपना केलोडे, सय्यद कूबरा जहा, आलम आरा, फरसजहा शरीफ, डॉ. यास्मिन, अंजुम शेख, नगरपंचायत सदस्या थरांगणा पटेल, अ‍ॅड. हुमेरा शरीफ, मुस्कान शरीफ, वर्षा किंगरे, रश्मी चौधरी, रजनी बोढाले या विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या.

या वेळी मुस्कान शरीफ यांनी नात पठण सादर करत रमजान महिन्याचे धार्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाला मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने येथे उत्साह आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमात एकवीरा महिला पतसंस्थेच्या सचिव माधुरी नगराळे, विद्या मत्ते, सुरेखा भेले, मंगला आसेकर, रंजना येरगुडे, वंदना दुमोरे, प्रतिभा डाखरे, विद्या भेले, जयश्री वरारकर, लता डाखरे, ऋतुजा तसेच पतसंस्थेचे कर्मचारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या प्रसंगी किरण देरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, पवित्र रमजान महिन्यात महिलांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या ध्येयाने प्रेरित होऊन अशा सामाजिक, राष्ट्रीय व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून हा उपक्रम आता अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. भविष्यातही समाजात सलोखा आणि ऐक्य वाढविणारे असे कार्यक्रम सातत्याने राबविले जातील, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या कार्यक्रमाचे निमित्त साधून पाटण येथील कब्रस्तानाच्या विकासासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि सामाजिक सलोख्याच्या भावनेतून साकारलेला हा इफ्तार सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता महिला सक्षमीकरण आणि समाजातील एकात्मता दृढ करणारा आदर्श उपक्रम ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी नात पठणाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण निर्माण झाले.

“जिथे हबीबचा जिक्र होतो, तिथे खुदाही जवळ असतो; त्या महफिलीत बसणारा प्रत्येक जण खरोखरच भाग्यवान असतो,” या ओळींनी कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Powered by Blogger.