Latest News

Latest News
Loading...

वणी सायडिंगवर कोळशाचं काळं कारस्थान? उच्च प्रतीचा कोळसा गायब, निकृष्ट कोळसा विद्युत प्रकल्पांकडे!


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील कोळसाखाणींतून वणी रेल्वे सायडिंगवर होणाऱ्या कोळसा वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याची धक्कादायक चर्चा सध्या जोर धरत आहे. उच्च प्रतीचा कोळसा काळ्या बाजारात वळवला जात असून त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा कोळसा विद्युत निर्मिती प्रकल्पांना पाठविला जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे शासनाची मोठी फसवणूक होत असल्याचीही चर्चा कोळसा वाहतूक क्षेत्रात रंगली आहे.

कोळसाखाणीतून ट्रकांद्वारे कोळसा आणून तो वणी रेल्वे सायडिंगवर साठवून ठेवला जातो. नंतर हा कोळसा मालवाहू रेल्वेच्या माध्यमातून वीज प्रकल्पांना पाठविला जातो. उकणी कोळसाखाणीतून वणी सायडिंगवर कोळसा वाहतूक करण्याचे कंत्राट मिळालेल्या कृष्णा इन्फ्रा (विशाल लॉजिस्टिक) या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकांकडून कोळसा चोरी होत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. दरम्यान, या कंपनीचे चार ते पाच ट्रक लालपुलिया परिसरातून कोळसा भरून येताना दिसल्याने सायडिंग परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात कंपनीचा एक ट्रक तब्बल पाच ते सहा दिवस सायडिंगवर थांबवून ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतरही संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने या संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे.
कोळसा चोरीचा हा प्रकार उजेडात आल्यानंतरही संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले नसल्याने वेकोलि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे कोळसा चोरीला अंतर्गत पातळीवरूनच पाठबळ मिळत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोळसा चोरी ही उकणी कोळसाखाणीपुरतीच मर्यादित नसून वेकोलिच्या आणखी एका कोळसाखाणीतूनही अशाच प्रकारे कोळसा गायब होत असल्याची चर्चा आहे. कोळसाखाणीतून सायडिंगकडे येणारे काही ट्रक लालपुलिया मार्गे येत असताना मार्गातच उच्च प्रतीचा कोळसा खासगी कोळसा प्लॉटवर उतरवून त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा कोळसा सायडिंगवर खाली केला जात असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार अत्यंत गोपनीय पद्धतीने केला जात असल्याने अधिकृत स्तरावर त्याची नोंद होत नसली तरी कोळसा वाहतूक क्षेत्रात याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, विद्युत निर्मिती प्रकल्पांसाठी राखीव असलेला कोळसा काळ्या बाजारात विकला जात असल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कोळशाची ज्वलन क्षमता कमी असल्याने त्याचा थेट परिणाम वीज निर्मिती प्रक्रियेवर होऊ शकतो. परिणामी, विद्युत प्रकल्पांचे संच बंद पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशी भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.

कोळसा चोरीच्या या व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात असून कोळसा तस्कर आणि त्यांचे पाठीराखे दिवसेंदिवस धनदांडगे होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कोळसा वाहतूक कंत्राटधारकांचे ट्रक लालपुलिया परिसरात कोळसा खाली करीत असल्याच्या चर्चांनी रान उठविले असतानाही वेकोलि प्रशासनाने अद्याप ठोस पावले न उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे कोळसाखाणींमध्ये अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असले तरी वणी रेल्वे सायडिंग परिसरात तशी कडक सुरक्षा व्यवस्था नसल्याने कोळसा तस्करांचे चांगलेच फावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोळसा चोरीचे हे जाळे नेमके कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे, हा प्रश्न आता नागरिक आणि कोळसा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

दरम्यान, कोळशातील ही हेराफेरी तातडीने थांबवून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा कोळशाच्या या काळ्या व्यवहारामुळे शासनाची फसवणूक तर होतच आहे; पण देशाच्या ऊर्जा व्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.