Latest News

Latest News
Loading...

केशव नागरी सहकारी पतसंस्थेचा ३४ वा वर्धापन दिन दिमाखात


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचा ३४ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ रोजी संस्थेच्या मुख्यालयात उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. सहकार चळवळीच्या मूल्यांना अधोरेखित करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अध्यक्ष चंद्रशेखर खोन्ड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे व मानद सचिव अनिल आक्केवार यांच्या हस्ते हा विधी पार पडला.

२७ मार्च १९९२ रोजी संघ स्वयंसेवक व सहकार भारती यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या संस्थेने प्रारंभीच्या संघर्षातून वाट काढत आज भक्कम उभारी घेतली आहे. वणी येथे स्वमालकीचे मुख्यालय उभारण्यासोबतच आर्णी, घाटंजी, पांढरकवडा आणि यवतमाळ येथे संस्थेच्या शाखा असून सहकार क्षेत्रात संस्थेने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आलेख मांडत शिस्त, प्रामाणिकता, विश्वास, चिकाटी आणि कार्यतत्परता या पंचसूत्रीवर संस्थेची भक्कम उभारणी झाल्याचे स्पष्ट केले. कठीण प्रसंगांना सामोरे जात सातत्याने काम केल्यामुळेच सभासद व ठेवीदारांचा दृढ विश्वास संपादन करण्यात संस्थेला यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्ष चंद्रशेखर खोन्ड यांनी स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत सहकार क्षेत्रातील संस्थेचे योगदान अधोरेखित केले. उपाध्यक्ष दौलत वाघमारे यांनी दीर्घ अनुभवाच्या आधारे सहकाराच्या माध्यमातून लोकांशी नातं जपण्याचे महत्त्व विशद केले, तर मानद सचिव अनिल आक्केवार यांनी व्यापारी व व्यावसायिकांना संस्थेशी जोडण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
कार्यक्रमात पांढरकवडा व आर्णी शाखांच्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. दोन्ही शाखांनी स्वमालकीच्या जागा खरेदी करून संस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भर घातल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संचालक, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी व अभिकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन घाटंजी शाखा व्यवस्थापक उदय कुळकर्णी यांनी केले, तर आभार विभागीय वसुली अधिकारी कवडू पिंपळकर यांनी मानले.

“विना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार” या विचारांना अनुसरून संस्था पुढील काळातही अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सहकाराच्या बळावर सामाजिक व आर्थिक प्रगती साधण्याचा निर्धार या सोहळ्यातून अधोरेखित झाला.




No comments:

Powered by Blogger.