प्रशांत चंदनखेडे वणी :-
वेकोलीशी संलग्न असलेल्या "नारायणी सन्स इंडिया प्रायव्हेट लोमिटेड" या उकणी कोळसाखानी लगत असलेल्या कंपनीचा व्होल्वो ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. ३० मार्चला दुपारी ३.४५ ते ४ वाजताच्या सुमारास घडली. ही कंपनी कोळसाखाणीत ओबी उत्खननाचं काम करीत असून नुकतेच या कंपनीला उकणी कोळसाखाणीचे विस्तारीकरण व भूगर्भातून कोळसा बाहेर काढण्याचे कंत्राट मिळाले आहे. या कंपनीचा व्होल्वो ट्रक डम्पिंग यार्डमध्ये माती खाली करून येत असतांना पलटी झाला, आणि यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वेकोलीशी संलग्न असलेल्या अनेक ओबी (ओव्हर बर्डन) कंपन्या वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रात कार्यरत आहे. कोळसाखाणीत नव्याने उत्खनन करून भूगर्भात दडलेला कोळसा बाहेर काढण्याचे कंत्राट या कंपन्यांना देण्यात आले आहे. या कंपन्या कोळसाखाणीत खोलवर उत्खनन करून उत्खननादरम्यान निघालेली मुरूम माती व्होल्वो ट्रकांमध्ये भरून डम्पिंग यार्डमध्ये खाली करतात. या कंपन्यांचे ओबी वाहतूक करणारे शेकडो व्होल्वो ट्रक कोळसाखाण परिसरात धावत असतात. उकणी कोळसाखानीलगत "नारायणी सन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड" ही कंपनी नव्याने उतरली आहे. या कंपनीला उकणी कोळसाखाणीचे विस्तारीकरण व भूगर्भातून कोळसा बाहेर काढण्याकरिता ओबी उत्खननाचे कंत्राट मिळाले आहे.
ओबी वाहून नेण्याकरिता या कंपनीने अनेक व्होल्वो ट्रक लावले असून या ट्रकांवर स्थानिक व परप्रांतीय चालकही मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. परंतु या कंपनीत चालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. कंपनीने चालकांना ट्रिपचे टार्गेट दिले असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने चालकांना ट्रिपचे टार्गेट दिल्याने चालकांकडून भरवेगात ट्रक चालविले जात असल्याचीही चर्चा कंपनी वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. यातच कंपनीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात चालकाचा नाहक बळी गेला. वीरभान यादव वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे जिल्हा सिद्दी (मध्यप्रदेश) असे या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाच्या कुटुंबियांना कंपनीकडून आर्थिक साहाय्य मिळावं याकरिता सर्व चालकांनी एकत्र येत कंपनीकडे तशी मागणी लावून धरली आहे.

No comments: