Latest News

Latest News
Loading...

वणीत ‘ऐतिहासिक काटा कुस्ती महादंगल’ गाजली; मातीच्या थराराने मैदान दणाणले


प्रशांत चंदनखेडे वणी :-

महाराष्ट्राच्या गौरवशाली कुस्ती परंपरेला साजेसा ‘ऐतिहासिक काटा कुस्ती महादंगल’ सोहळा जत्रा मैदान येथील स्व. सुनंदा मधुकरराव उंबरकर स्टेडियमवर अत्यंत दिमाखात पार पडला. देशाच्या विविध भागांतून आलेल्या नामांकित मल्लांनी आपल्या दमदार खेळाने आणि ताकदीच्या जोरावर उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.
या महादंगलीच्या निमित्ताने मैदानात मातीचा थरार अनुभवायला मिळाला. प्रत्येक सामना रोमहर्षक ठरत असताना काट्याची टक्कर पाहायला मिळाली. स्पर्धेपूर्वी मैदानाचे भूमिपूजन मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते पार पडले.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून व राजू उंबरकर यांच्या सौजन्याने शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी जत्रेनिमित्त आयोजित या स्पर्धेला काँग्रेस नेते संजय खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील प्रत्येक सामना ‘धोबीपछाड’च्या थराराने रंगत गेला. पुरुष गटात पैलवान विजय शिंदे (वाशिम) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘मानाची गदा’ पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तर पैलवान अक्षय शेळके (पुणे) हे उपविजेते ठरले. महिला गटात पैलवान अनुष्का पांडुरंग गादेकर हिने दमदार खेळ सादर करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महिला शक्तीचा हा झंझावात उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
विजेत्या खेळाडूंना मानाची गदा व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. वणीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही महादंगल खऱ्या अर्थाने गाजली असून, मातीतील खेळांची परंपरा जपण्याचा हा यशस्वी प्रयत्न ठरला.

No comments:

Powered by Blogger.