प्रशांत चंदनखेडे वणी :-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघातील अतिक्रमणधारकांच्या घरपट्ट्यांच्या प्रश्नावर आता निर्णायक हालचाली होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वणीचे आमदार संजय देरकर यांनी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.
“अतिक्रमणधारकांना आता केवळ आश्वासने देण्याचा काळ संपला आहे. त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे, पण मालकी हक्क नाही. आता त्यांना त्यांच्या घरांचे अधिकृत पट्टे देऊन न्याय द्यावा,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.
आमदार संजय देरकर यांनी गेल्या वर्षभरापासून नगरपरिषदेच्या माध्यमातून या प्रश्नावर नियोजनबद्ध काम केले आहे. मतदारसंघातील अतिक्रमणधारकांचे सविस्तर सर्वेक्षण, तांत्रिक नकाशे तयार करणे, पात्र लाभार्थी निश्चित करणे आणि त्याबाबतचा अहवाल तयार करणे अशी संपूर्ण प्रक्रिया त्यांनी स्वतः पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली आहे.
मात्र, सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही गेल्या चार महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर कामाला गती मिळत नसल्याने त्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली. “मी स्वतः पुढाकार घेऊन सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. मग लाभार्थ्यांना घरपट्टे वाटप करण्यास उशीर का होत आहे? सामान्य जनता रोज या प्रश्नाबाबत मला विचारणा करत आहे. सरकारने तातडीने या प्रक्रियेची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्याची कार्यवाही करावी,” अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षांतील राजकारणावरही थेट बोट ठेवले. “गेल्या दशकभरात काहींनी या प्रश्नाचे केवळ राजकारण केले, परंतु गोरगरीबांच्या पदरात काहीही पडले नाही. जनतेच्या अपेक्षांशी खेळ करणारे हे राजकारण आता थांबले पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी या विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, आमदार देरकर यांनी विधानसभेत हा मुद्दा ठामपणे मांडल्याने वणी मतदारसंघातील हजारो अतिक्रमणधारकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे स्वतःच्या घरात राहत असली तरी त्यांना मालकी हक्काची कागदपत्रे नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मात्र आमदार देरकर यांनी अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाचा मुद्दा विधानसभेत प्रभावीपणे मांडल्याने अतिक्रमणधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
घरपट्टे मिळाल्यास लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या ‘घरकुल’ योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार संजय देरकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनालाही या प्रक्रियेला गती द्यावी लागणार असून, लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या हातात त्यांच्या हक्काची घरपट्ट्यांची कागदपत्रे पडतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments: