इतिहास घडवणाऱ्या पराक्रमी राजाच्या स्मृती जागवणारा आणि समाजाला एकोपा व प्रेरणेचा संदेश देणारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव राजूर कॉलरी येथे यंदाही उत्साह, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. युवासेना (उबाठा) राजूर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रंगत, मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे आणि स्थानिक कलाकारांच्या सन्मानामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांच्या अध्यक्षतेत पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता मोहोड, ग्रा.प. सदस्या वैशाली देठे, माजी सरपंच प्रणिता मो. असलम, नगरपरिषद सदस्य सुधीर थेरे, माजी जि.प. सदस्य बंडू चांदेकर, अशोक भगत. मो. असलम, गोलू बदखल, विनोद ढुमणे, डॉ. बोबडे, बबिता सिंग, रेहाना सिद्दीकी, ओम चिमुरकर, अमर तितरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेल्या कर्तव्यभावनेचा उल्लेख करत त्यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.
यावेळी बोलताना संजय निखाडे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ देत समाजातील ऐक्य आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरा पगड जातींना सोबत घेतले आणि समाजातील सर्व घटकांना समान न्याय दिला. त्यांच्या राज्यकारभारात जातीपातीचा भेदभाव नव्हता, तर रयतेचे हित आणि सुरक्षितता हेच सर्वोच्च ध्येय होते. महाराजांच्या राज्यात हिंदू-मुस्लिम असा भेदभाव नव्हता; त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात सर्व समाजघटकांना समान स्थान होते.
मात्र आजच्या काळात काही राजकीय प्रवाह इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात जातीयतेची दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः इतिहास वाचून, अभ्यास करून महाराजांचा खरा विचार समजून घेतला पाहिजे. समाजात एकोपा आणि बंधुभाव टिकवून ठेवणे हीच शिवाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी मांडले.
तर युवासेना राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले यांनी महापुरुषांना जातीय चौकटीत बंदिस्त करण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र शब्दांत टीका केली. इतिहासातील महापुरुष हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसतात; त्यांचे कार्य संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले आणि सामान्य जनतेला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाहीची पायाभरणी करत प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून दिला.
दोन्ही महापुरुषांचे कार्य हे समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी होते. तरीही त्यांना जातीय चौकटीत अडकवण्याचे प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात; मात्र त्यांच्या शिकवणीचा आणि सामाजिक कार्याचा अंगीकार करण्याकडे दुर्लक्ष होते, ही खरी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. समाजातील जातीधर्मांच्या भिंती तोडून एकोपा आणि बंधुभाव जपला, तरच महापुरुषांच्या कार्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
जयंती महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. कराओके गायनातून ओळख निर्माण केलेल्या राजूर कॉलरी येथील मनोज सोनेकर, विनोद येसांबरे, राजू पुडके, नागोराव फिल्लारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या लावण्या पुनवटकर व जिया पाटील यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. शिवाजी महाराजांची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकणाऱ्या शाश्वत फुलझेले यालाही विशेषत्वाने गौरविण्यात आले.
यानंतर क्लासिकल डान्स, सुरसंगीत व उपस्थितांसाठी भव्य भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध उपक्रमांनी नटलेला हा जयंती महोत्सव राजूर कॉलरी परिसरात उत्साह, अभिमान आणि ऐक्याची भावना निर्माण करणारा ठरला.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत फुलझेले, दिशा फुलझेले, अभिजित सुरशे, प्रफुल पाटील, शिनु दासारी, आकाश जोगदंडे, बंडू मोडक, बादल वाळके, अमर नगराळे, बंटी वाळके, आकाश बोरगलवार, साजिद खान आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शिवजयंतीच्या निमित्ताने इतिहासाची प्रेरणा, संस्कृतीचा अभिमान आणि समाजातील एकोप्याचा संदेश देणारा हा सोहळा राजूर कॉलरीत संस्मरणीय ठरला.

No comments: