Latest News

Latest News
Loading...

बारसमोरील किरकोळ वादातून व्यावसायिकावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील आशा बियरबार परिसरात पुन्हा एकदा टपोरी तरुणांचा धुमाकूळ पाहायला मिळाला असून किरकोळ वादातून एका व्यावसायिकावर खुर्चीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय (वय ३२, रा. गाडगे बाबा चौक, जत्रा रोड, वणी) हे मंगळवारी आपल्या दोन मित्रांसोबत दत्त मंदिराजवळील चिंतामणी कृषी केंद्राच्या गोदाम परिसरात बसून चर्चा करत होते. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास ते तिघेही वणीतील आशा बियरबार येथे दारू घेण्यासाठी गेले.

परंतु बारमध्ये प्रवेश करण्यास व्यवस्थापकाने मनाई केल्याने त्यांनी बाहेरूनच दारूचे पार्सल घेतले. त्याचवेळी अंशु तांबे (वय २८, रा. वणी) हा देखील आपल्या मित्रासह बारजवळ आला. दरम्यान अक्षय व त्यांच्या मित्रांमध्ये संभाषण सुरु असतांना अंशू तांबे व त्याचा मित्र त्यांच्या संभाषणात हस्तक्षेप करू लागल्याने दोन्ही बाजूंनी किरकोळ शाब्दिक वाद झाला. त्यानंतर अक्षय व त्यांचा मित्र तेथून निघून पुन्हा दत्त मंदिराजवळील गोदाम परिसरात बसले.

मात्र मनात राग धरून असलेला अंशु तांबे हा काही वेळातच आपल्या दोन साथीदारांसह तेथे पोहोचला आणि अक्षय यांच्याशी त्याने पुन्हा वाद घातला. यावेळी सुडाने पेटलेल्या अंशू तांबे याने संतापाच्या भरात तेथील प्लास्टिकची खुर्ची उचलून अक्षय यांच्या डोक्यावर मारली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जखम झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.

दरम्यान आरोपीच्या एका साथीदाराने तेथे उभी असलेल्या मोटारसायकलवर दगड मारून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत अक्षय यांनी मित्रांच्या मदतीने वणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अंशू तांबे व त्याच्या दोन साथीदारांवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

टपोरी तरुणांचा वाढता धुमाकूळ

दरम्यान, शहरात काही टपोरी तरुणांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी घोळक्याने जमून अश्लील भाषेत मोठमोठ्याने बोलणे, गोंधळ घालणे, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करणे, हे प्रकार सध्या शहरात वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे महिला व मुलींचे रस्त्याने येणे-जाणेही अवघड होत असल्याची तक्रार आहे.

विशेषतः आशा बियरबार परिसरात रात्री दारुड्यांचा प्रचंड गोंधळ व धिंगाणा सुरू असतो, असे स्थानिक नागरिक सांगतात. रस्त्यावरच उभे राहून दारू पिणे, लघुशंका करणे यामुळे महिलांना मान खाली घालून जावे लागते. हा मार्ग मुख्य रस्त्याला जोडणारा असून येथील नागरिकांचा जाण्यायेण्याचा हा दैनंदिन मार्ग आहे. तसेच सकाळच्या मॉर्निंग वॉकपासून ते रात्री शतपावलीसाठी अनेक नागरिक या रस्त्याचा वापर करतात.

यापूर्वीही मारहाणीच्या घटना

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आशा बियरबार परिसरात यापूर्वीही अनेकदा भांडणे झाली असून टोकाच्या वादातून हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांत नागरिक गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. एका घटनेत  परिसरातील रहिवाशाला मारहाण होत असतांना मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणाला दारुड्यांनी बेदम मारहाण केल्याने तो कोमात गेल्याची घटना घडल्याचेही सांगितले जाते.

या गंभीर घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी आशा बियरबारवर मोर्चा काढला. आणि रहिवाशी वस्तीलगत असलेल्या या बियरबारचा परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी केली होती. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या ताज्या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.