Latest News

Latest News
Loading...

दारूच्या नशेत धुडगूस; युवकावर दांडक्याने हल्ला, घरातील टीव्हीही फोडला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

दारूच्या नशेत विनाकारण वाद घालून एका तरुणाने आपल्या नातेवाईकाच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकावर दांडक्याने हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी (३ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील दामले फैल येथे घडली. दांडक्याने डोक्यावर प्रहार करण्यात आल्याने युवकाला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने झालेल्या मारहाणीबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभय शंकर भलमे (वय ३४, रा. दामलेफैल, वणी) हे मजुरीचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते घरी असताना शेजारील गणेश वाघमारे यांचा जावई पवन विनोद सराटे (वय २३, रा. खरबडा मोहल्ला, वणी) हा त्यांच्या घरासमोर आला. दारूच्या नशेत असलेल्या सराटेने कोणतेही कारण नसताना भलमे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी भलमे यांनी शेजारी राहणाऱ्या गणेश वाघमारे यांना आवाज देऊन त्यांच्या जावयाला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत तर्राट असलेल्या पवन सराटेने हातातील लाकडी दांडक्याने भलमे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला कानाजवळ प्रहार केला. लाकडी दांडा डोक्यावर मारल्याने भलमे यांचे डोके फुटून त्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच “एकटा सापडला तर जीव घेईन” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, वाद सोडविण्यासाठी अभय भलमे यांचा भाऊ अक्षय नारायण भलमे हा पुढे आला असता त्यालाही आरोपीने मारहाण करून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने घरात घुसून टीव्ही फोडून नुकसान केल्याचा आरोपही पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.

यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या अभय भलमे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी पवन विनोद सराटे याच्यावर 115(2), 118(1), 324(4), 351(2)(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या अशा हिंसक प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.