वेकोलि कोळसा वाहतुकीत काळं कारस्थान? उच्च दर्जाचा कोळसा काळ्या बाजारात; दोन ट्रक पकडले, पण ‘मोठे मासे’ अद्याप मोकाट
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)च्या उकणी कोळसाखाणीतून वणी रेल्वे सायडिंगवर होणारी कोळशाची वाहतूक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उच्च दर्जाचा कोळसा सायडिंगवर न उतरवता तो काळ्या बाजारात विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर वेकोलि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अलीकडेच कृष्णा इन्फ्रा. (विशाल लॉजिस्टिक) या कोळसा वाहतूक कंपनीचे दोन ट्रक ‘ऑन द स्पॉट’ पकडण्यात आले. या ट्रकमधील कोळसा हा उकणी कोळसाखाणीतील नसून तो कोळसासदृश्य मिश्रित माल असल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करून दोन ट्रक चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र वाहतूक कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
‘उच्च दर्जाचा कोळसा बाहेर, निकृष्ट माल सायडिंगवर’?
कोळसा व्यावसायिक व वाहतूकदारांमध्ये दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार, खाणीतून भरून निघालेला दर्जेदार कोळसा लालपुलिया परिसरातील एका कोलडेपोवर उतरविला जातो. त्याऐवजी चुरी, भुकटी, शेल कोळसा व दगड यांचे मिश्रण करून तयार केलेला निकृष्ट माल तेवढ्याच वजनाने ट्रकमध्ये भरून सायडिंगवर खाली केला जातो. हा माल पुढे रेल्वेमार्फत शासनाच्या वीज प्रकल्पांकडे रवाना होत असल्याचे सांगितले जाते.
निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे वीज प्रकल्पांतील यंत्रणांवर परिणाम होण्याचा धोका असतानाही संबंधित यंत्रणा डोळेझाक करीत असल्याची चर्चा आहे. सायडिंगवरील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा प्रकार माहीत असल्याचेही बोलले जात आहे.
सुरक्षा यंत्रणा कुठे हरवली?
कोळसा चोरी रोखण्यासाठी कोळसाखाणींमध्ये एमएसएफ जवान तैनात करण्यात आले असले तरी मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी तस्करीचे ‘खेळ’ सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. उकणीसह अन्य एका कोळसाखाणीतून कोळसा तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.
काही दिवसांपूर्वी संबंधित कंपनीचे ट्रक नियोजित मार्गाऐवजी विरुद्ध दिशेने कोळसा वाहतूक करतांना आढळले होते. त्यातील एक ट्रक तब्बल पाच ते सहा दिवस सायडिंगवर उभा ठेवण्यात आला होता. त्यावेळीही कोळशात हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्यावर पडदा टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
‘मोठे मासे’ गळाला कधी?
कोळसा चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर केवळ चालकांवर गुन्हे दाखल करून प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वेकोलि वर्तुळातच केला जात आहे. वाहतूक कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई अपेक्षित असताना ती टाळण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
लालपुलिया परिसरातील एका कोलडेपोमध्ये चोरीचा कोळसा उतरविला जात असल्याची उघड चर्चा असतानाही तेथे तपासणी न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीचा कोळसा खरेदी करण्यात तरबेज असणारा एक दास लालपुलिया परिसरात कोलडेपो थाटून आहे. याची कोळसा क्षेत्रातील सर्वांनाच कल्पना आहे. मात्र या कोलडेपोची कधी चौकशीच होतांना दिसत नाही. कोळसा तस्करीतून अनेक छोटे मोठे कोळसा वाहतूकदार, संबंधित व्यावसायिक व तस्कर गब्बर झाले आहेत. आता तेच वेकोलिचे मोठमोठे कोळशाचे कंत्राट घेत आहेत. तसेच या सर्व प्रकरणामागे काही ‘पांढरपेशी’ राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, वेकोलि प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितले असले तरी अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र आहे. कोळसा तस्करीचे हे जाळे नेमके किती खोलवर रुजले आहे आणि त्यामागील ‘मोठे मासे’ गळाला कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpeg)



No comments: