Latest News

Latest News
Loading...

रंगपंचमीला हास्याची उधळण; वणीत कविसंमेलनाची पंचवीस वर्षांची परंपरा कायम


प्रशांत चंदनखेडे वणी :-

धुळीवंदनाच्या रंगोत्सवानंतर संध्याकाळी हास्याची उधळण करण्याची परंपरा जपणारे वणी शहर यंदाही खळखळून हसण्यास सज्ज झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने हास्य कविसंमेलनाचे आयोजन करणाऱ्या अखिल भारतीय अति दीडशहाणे समितीतर्फे यंदाही रंगपंचमीला (सायं. ७ वा.) शासकीय मैदानावर भव्य हास्य मैफिल रंगणार आहे.

धुळवडीचा जल्लोष ओसरताच शब्दांच्या रंगांनी मन रंगविण्याची ही परंपरा वणीकरांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. ‘अति दीडशहाणे’ या नावालाच साजेशी विनोदबुद्धी, उपरोध आणि सामाजिक भान जपत समितीने गेल्या चतुर्थांश शतकात असंख्य रसिकांना खळखळून हसविले आहे. विनोदातून वास्तवाला स्पर्श करण्याची आणि हलक्याफुलक्या शब्दांतून जीवनातील ताण हलके करण्याची ताकद या व्यासपीठाने सातत्याने दाखवून दिली आहे.

यंदाच्या कविसंमेलनात देशभरातील नामांकित हास्यकवींना आमंत्रित करण्यात आले आहे. देवास (म.प्र.) येथील शशिकांत यादव, नवी दिल्लीचे सरदार प्रताप फौजदार, सुरतच्या सुश्री सोनल जैन, रीवा (उ.प्र.) येथील अमित शुक्ला आणि शाजापूरचे दिनेश ‘देसी घी’ हे कवी आपल्या खुसखुशीत सादरीकरणातून रसिकांना हास्याच्या रंगात रंगविणार आहेत. त्यांच्या विनोदी कविता, समकालीन विषयांवरील उपरोधिक भाष्य आणि दैनंदिन जीवनातील गंमतीजमतींमुळे हास्याचे फुलोरे फुलतील आणि मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

समितीच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे हा सोहळा वर्षानुवर्षे अधिक भव्य आणि लोकप्रिय होत आहे. ग्रामीण-शहरी रसिकांना एकत्र आणत हास्याच्या धाग्यांनी समाजबंध दृढ करण्याचे कार्य या व्यासपीठाने सातत्याने केले आहे.

“धुळवडीचा आनंद साजरा केल्यानंतर काही क्षण का होईना जीवनातील ताणतणाव दूर सारून तसेच चिंता आणि नैराश्य विसरून मनमोकळं हसायला भाग पाडणारे हे कविसंमेलन केवळ एक कार्यक्रम नसून वणीच्या सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात काही क्षण मनमोकळं हसणंही दुर्मिळ झालं आहे. अशा वेळी रंगपंचमीच्या निमित्ताने आयोजित हे कविसंमेलन वणीकरांना ‘हसत रहा, जगत रहा’चा संदेश देणार आहे. "रंगाच्या सणानंतर हास्याचे रंग उधळण्यासाठी वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

रंगांच्या उत्सवानंतर शब्दांच्या रंगांची ही उधळण वणीकरांच्या मनात आशावादाचे नवे रंग भरून जाईल, यात शंका नाही. पंचवीस वर्षांची परंपरा जपत हास्याचा हा जल्लोष यंदाही वणीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार आहे.

No comments:

Powered by Blogger.