Latest News

Latest News
Loading...

होळीच्या पूर्वसंध्येला काळाचा घाला! ट्रॅक्टर अपघातात २३ वर्षीय कर्त्या तरुणाचा मृत्यू; गावात शोककळा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आनंद, रंग आणि उत्साह घेऊन येणाऱ्या होळी सणाच्या तोंडावर मार्डी गावावर दुःखाचे सावट पसरले.  शेतातून काम आटोपून घरी परतणाऱ्या २३ वर्षीय कर्त्या तरुणाचा ट्रॅक्टर अपघातात जागीच मृत्यू झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.

अभय बंडुजी येरमे (वय २३, रा. मार्डी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रोजमजुरीसोबतच ट्रॅक्टर चालक म्हणूनही काम करत होता. रविवारी (दि. १ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तो मजरा येथून मार्डीकडे ट्रॅक्टर (क्र. MH 29 AK 2924) घेऊन येत असताना रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. आणि ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या नालीत पलटी झाल्याने अभय हा ट्रॅक्टरखाली दबला गेला.

ट्रॅक्टरचा अपघात झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नाने त्याला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. एका क्षणात कुटुंबाचा आधारवड हरपल्याने येरमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

होळीच्या तयारीत असलेल्या घरात सणाऐवजी अंत्यसंस्काराची तयारी करावी लागल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. तर “घर चालवण्यासाठी झटणाऱ्या मुलाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंब हादरलं आहे.

याबाबत मृतक तरुणाचे वडील बंडूजी आजबराव येरमे (49) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ व १०६ (१) अन्वये गुन्हा  नोंद केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके, पोलीस शिपाई सागर दीपेवार करीत आहे.

या घटनेने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रंगपंचमीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून मार्डी गावात शोककळा पसरली आहे.

No comments:

Powered by Blogger.