आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहातही ग्रामीण संस्कृतीची अस्सल परंपरा जपणारा शंकरपट पुन्हा एकदा वणीकरांच्या भेटीला येत आहे. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर २२ ते २४ मार्चदरम्यान ‘विदर्भ केसरी’ शंकरपटाचे दणदणीत आयोजन करण्यात आले असून, या तीन दिवसांत बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी परिसर सज्ज झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौजन्याने आणि शंभू फॅन्स क्लबच्या पुढाकारातून साकारत असलेला हा शंकरपट केवळ क्रीडा स्पर्धा नसून शेतकरी संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली व परंपरेचा जिवंत उत्सव ठरणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, यानिमित्ताने वणी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शंकरपट म्हणजे धाडस, वेग आणि कौशल्याचा संगम. क्षणाक्षणाला रंगत जाणाऱ्या या शर्यतींमध्ये बैलजोडी आणि चालक यांच्यातील समन्वय, त्यांचा अचूक अंदाज आणि वेगावरची पकड प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवते. अंगावर शहारे आणणाऱ्या या स्पर्धा ग्रामीण क्रीडापरंपरेचे अनोखे रूप उलगडतात.
ही बैलगाडा स्पर्धा ‘अ’ व ‘क’ अशा दोन गटांत खेळविण्यात येणार असून, तब्बल ३ लाख रुपयांच्या रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही गटांसाठी प्रत्येकी ९ बक्षिसे ठेवण्यात आली असून, वणीसह मारेगाव, पांढरकवडा, झरी, वरोरा, भद्रावती, कोरपना आणि राजुरा तालुक्यातील बैलजोड्यांसह इतरही तालुक्यातील बैलजोड्यांचा सहभाग या स्पर्धेला अधिक रंगतदार करणार आहे.
ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपण्याबरोबरच नव्या पिढीला परंपरेची ओळख करून देण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या थरारक शंकरपटाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या जल्लोषात वणीचे पटांगण बैलगाड्यांच्या गडगडाटाने दुमदुमणार असून, ‘विदर्भ केसरी’ शंकरपट ग्रामीण परंपरेचा अभिमान पुन्हा एकदा अधोरेखित करणार आहे.

No comments: