समतेच्या लढ्याची शताब्दी स्मरणयात्रा; ऐतिहासिक क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्याकरिता माकप कार्यकर्ते महाडला रवाना
सामाजिक समतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त त्या क्रांतिकारी लढ्याला अभिवादन करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उत्साहात महाडकडे रवाना झाले आहेत. समतेच्या या ऐतिहासिक क्रांतीला उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमामुळे जिल्ह्यात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
१९२७ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा संघर्ष नव्हता, तर तो मानवी स्वाभिमान, समानता आणि सामाजिक न्यायासाठीचा निर्णायक एल्गार होता. अस्पृश्यतेच्या बेड्या तोडत हजारो अनुयायांसह चवदार तळ्यावर जाऊन सामूहिक जलप्राशन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “पाणी हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे” हा संदेश जगासमोर ठामपणे मांडला. या सत्याग्रहाने भारतीय समाजव्यवस्थेत परिवर्तनाची नवी पहाट घडवली.
या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी स्मरणार्थ १९ व २० मार्च रोजी महाड येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची पुनःप्रत्ययकता करून देणाऱ्या या परिषदेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कमिटी सदस्य व कार्यकर्त्यांचा ताफा महाडकडे रवाना झाला आहे. या सहभागातून समतेच्या लढ्याशी असलेली बांधिलकी अधोरेखित होत असून, सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त होत आहे.
महाडच्या त्या ऐतिहासिक जलसत्याग्रहाची शताब्दी ही केवळ स्मरणाचा क्षण नसून, समतेच्या लढ्याची मशाल अधिक तेजाने प्रज्वलित करण्याची प्रेरणा आहे—अशी भावना या उपक्रमातून प्रकर्षाने पुढे येत आहे.

No comments: