प्रशांत चंदनखेडे वणी:-
अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळत असून, वणी शहरात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत ‘एमडी’ (मेफेड्रोन) या सिंथेटिक ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईत २ लाख ३० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहरातील ड्रग्स साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला वणी परिसरात ‘एमडी’ ड्रग्सची विक्री होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे १८ एप्रिल रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशमुख वाडी परिसरातील बसस्थानकाच्या मागील रस्त्यावर सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळ ‘एमडी’ ड्रग्स आढळून आले.
आरोपींची नावे राहुल दिलीप ठाकुरवार (वय ४०, रा. देशमुख वाडी, वणी) व प्रितम लिलाराम केशवाणी (वय ४४, रा. गुरुनानक नगर, वणी) अशी आहेत. पंचासमक्ष त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून २१ ग्रॅम १८ मिलीग्रॅम ‘एमडी’ ड्रग्स (किंमत सुमारे १,२७,०८० रुपये), रोख रक्कम, मोबाईल फोन आणि विनाक्रमांक मोपेड असा एकूण २,३०,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुधिर खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, पोकॉ. सलमान शेख, रजनीकांत मडावी, चापोना सतीश फुके यांनी केली.
दरम्यान, वणी शहरात ‘एमडी’सारख्या घातक अंमली पदार्थाचा शिरकाव झाल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे ड्रग्स विक्रेत्यांमध्ये भीती पसरली असून, पुढील काळात आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments: