Latest News

Latest News
Loading...

अन्न सुरक्षा विभागाची ‘मामा पान सेंटर’वर धाड; प्रतिबंधित पानमसाला-खर्रा जप्त


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोरील ‘मामा पान सेंटर’वर अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकान मालकाविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा तसेच बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न व औषध प्रशासन यवतमाळ) यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकत दुकानाची झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व खर्रा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.

या कारवाईत सय्यद नवाज अली सय्यद बशीर अली (वय ३२, रा. माळीपुरा रोड, वणी) याच्या ताब्यातून ‘सिग्नेचर’, ‘विमल’, ‘पानपराग’ या ब्रँडचा पानमसाला तसेच सुगंधित तंबाखू-सुपारी मिश्रित खर्रा असा एकूण सुमारे १.४७ किलो वजनाचा व ३,२४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्यात प्रतिबंधित असलेले हे पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम २०११ तसेच बीएनएसच्या कलम १२३, २७४, २७५, २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अद्याप सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या या धडक कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.