Latest News

Latest News
Loading...

‘धाड’ थांबल्या, सट्टा वाढला? आयपीएल हंगामात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


प्रशांत चंदनखेडे वणी :-

एकेकाळी आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर नियमित धाड टाकून सट्टेबाजांना धडा शिकवणारी पोलीस यंत्रणा आता शांत का, असा सवाल शहरात उपस्थित होत आहे. मागील दोन-तीन वर्षांचा काळ सोडला तर यापूर्वी प्रत्येक आयपीएल हंगामात गुप्त माहितीच्या आधारे सट्टा अड्ड्यांवर धडक कारवाया होत असत. बुकी आणि त्यांच्या ‘फन्टरां’वर गुन्हे दाखल होत, लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले जात असे. मात्र सध्याच्या परिस्थितीत अशा कारवाया पूर्णतः थांबल्याचे चित्र समोर येत आहे.

दरम्यान, आयपीएल सुरू होताच शहरात पुन्हा क्रिकेट सट्ट्याचा ‘बाजार’ रंगात आल्याची चर्चा आहे. विविध भागांत ऑनलाइन बेटिंगचे अड्डे सक्रिय असल्याची माहिती समोर येत असताना पोलिसांकडून ठोस कारवाईचा अभाव जाणवत आहे. यामुळे सट्टेबाजांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.

पूर्वी पोलिसांची गुप्त यंत्रणा सक्रिय राहून सट्टा अड्ड्यांवर अचानक छापे टाकत असे. अनेकदा मध्यरात्रीही धाड टाकून बुकींना अटक करण्यात येत असे. या कारवायांमुळे सट्टेबाजांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता या धाडसत्राचा पूर्णपणे अभाव असल्याने परिस्थिती उलट दिशेने गेल्याचे दिसते.

सट्टा हा केवळ कायद्याचा भंग नसून सामाजिकदृष्ट्याही घातक ठरत आहे. सट्ट्यातून झटपट पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक तरुण कर्जबाजारी होत असून, सट्ट्यात पैसे गमाविणाऱ्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. त्यामुळे या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरत असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पोलिसांची ही बदललेली भूमिका नेमकी कशामुळे, हा प्रश्न आता शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. गुप्त माहितीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, याबाबत स्पष्टता नसल्याने शंका अधिकच गडद होत आहेत.

दरम्यान, आयपीएल हंगामात सट्ट्याला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा कडक कारवाईची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी पूर्वीप्रमाणे सक्रिय भूमिका घेत सट्टा अड्ड्यांवर धडक कारवाई करावी, अन्यथा हा अवैध ‘बाजार’ आणखी फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.