Latest News

Latest News
Loading...

‘जयभीम’च्या जयघोषाने शहर दुमदुमले; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वणी शहरात उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. पहाटेपासूनच शहरात ‘जयभीम’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करण्यात आले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. राजकीय नेते व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहात मानवंदना देत बाबासाहेबांच्या विचारांना वंदन केले.

जयंतीनिमित्त शहरात रक्तदान शिबिरे, बुद्ध-भीम गीतांचे प्रबोधनपर कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विविध नगरांतून वाजतगाजत निघालेल्या मिरवणुका सम्राट अशोक बुद्धविहाराजवळ एकत्र आल्या आणि तेथून सार्वत्रिक मिरवणुकीला प्रारंभ झाला.

आकर्षक सजावट, देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जयभीम’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. ‘बाबासाहेब अमर रहे’च्या जयघोषात निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. तेथे सामूहिक बुद्धवंदनेने मिरवणुकीची सांगता झाली. प्रत्येक नगरातील मंडळ प्रमुखांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील ध्वजाजवळही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजून एक मिनिटांनी केक कापून व फटाक्यांची आतषबाजी करून जयंतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी मुख्य कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजाचे धजारोहण व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अर्चना कांबळे यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे विचार समाजासाठी किती प्रेरणादायी आहेत, हे अधोरेखित केले. “बाबासाहेबांनी शोषित, पीडितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी मानवंदना आहे,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी महिलांनी सादर केलेल्या बुद्ध-भीम गीतांनी वातावरण भारावून गेले. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या गीतांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत चंदनखेडे यांनी केले. उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

सायंकाळी पंचशील ध्वजाजवळून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रेल्वे स्टेशन परिसर, गौरकार ले-आऊट, विठ्ठलवाडी आणि पट्टाचारा नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. पुरुषोत्तम पाटील आणि प्रशांत चंदनखेडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मिरवणुकीने परिसरात उत्सवाचे रंग भरले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष गरपाल, बंडू लभाने, राहुल चंदनखेडे, सुरज खैरे, शुभम नगराळे, अविनाश बोरकर, वैभव गजभिये यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला रेल्वे स्टेशन, गौरकार कॉलनी व विठ्ठलवाडी परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देत साजरी झालेली बाबासाहेबांची जयंती वणीकरांच्या मनात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करून गेली. महामानवाच्या विचारांचा जागर नागरिकांमध्ये रुजवणारा हा उत्सव शहरासाठी सामाजिक ऐक्याचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.

No comments:

Powered by Blogger.