Latest News

Latest News
Loading...

दुचाकीला धडक देऊन कार रस्त्याच्या कडेला उलटली, दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :-

भरधाव कारने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा वरोरा येथे रुग्णालयात हलविल्यानंतर मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच मोटारसायकलला धडक देणाऱ्या कारमधील दोन प्रवाशी या अपघातात जखमी झाले आहेत. ही घटना वणी वरोरा महामार्गावरील वर्धा नदीच्या पाटाळा पुलाजवळ १५ एप्रिलला दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली.

वणी तालुक्यातील मानकी या गावात राहणारा अनिल बाबाराव कुत्तरमारे (४२) व वांजरी येथील रहिवाशी असलेला  प्रदीप रमेश ठमके (३१) हे दोन युवक मोटारसायकलने (MH २९ B ०९६३) शेंबड या गावाकडे जात असतांना पाटाळा पुलाजवळ मागून सुसाट येणाऱ्या कारने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात अनिल कुत्तरमारे याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रदीप ठमके याला वरोरा येथील रुग्णालयात हलविल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 

दुचाकीला धडक दिल्यानंतर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या कडेला खोलगट भागात उलटली. तीन ते चार पलट्या घेत कार रस्त्यालगतच्या शेतात कोसळली. यात कारमधील दोन प्रवाशी जखमी झाले आहेत. 

ही कार मारेगाव वरून वरोऱ्याकडे जात असतांना हा भीषण अपघात घडला. कारमधील दोनही प्रवाशी हे मारेगाव येथील रहिवाशी असल्याचे समजते. कारने आधी दुचाकीला मागून धडक दिली. आणि नंतर कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर कारमधील दोन प्रवाशी जखमी झाले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.