प्रशांत चंदनखेडे वणी:-
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना १४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला काही तासांतच अटक केली असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चेतन पुरुषोत्तम तुराणकर (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीच्या कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेत बळजबरी लैंगिक अत्याचार केला. लालगुडा चौपाटी वळण रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गावात ही संतापजनक घटना घडली.
घटनेनंतर पीडित तरुणीने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला. या धक्कादायक घटनेनंतर आजीने तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीला अवघ्या काही तासांतच अटक केली.
पीडित मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून पुढील तपासणीसाठी तिला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३७६ तसेच पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

No comments: