Latest News

Latest News
Loading...

वणीत पुन्हा गोमांस तस्करीचा पर्दाफाश! पोलिसांची धडक कारवाई; १३० किलोहून अधिक गोमांस जप्त, तिघांविरुद्ध गुन्हे


प्रशांत चंदनखेडे वणी :-

गोवंश जनावरांच्या कत्तलीवर शासनाने कडक निर्बंध लावलेले असतानाही वणी शहरात गोमांस तस्करी सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. गोकुळनगर परिसरात पोलिसांनी १० एप्रिल रोजी सकाळी केलेल्या धडक कारवाईत १३० किलोहून अधिक गोमांस जप्त करण्यात आले असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना काही इसम वाहनातून मोठ्या प्रमाणात गोमांस विक्रीसाठी नेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोकुळनगर येथे छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तस्करांनी गोमांसाने भरलेली पोती रस्त्यावर टाकून पळ काढला. घटनास्थळावरून पोलिसांनी अंदाजे ९० किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त केले असून त्याची किंमत सुमारे १८,१०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी सलमान शकिल शेख (वय २५) व नावेद शेख रियाज (वय २२, दोघेही रा. खडबडा मोहल्ला, वणी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याच मार्गाने एक तरुण संशयितरित्या मोपेडवर येताना आढळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ आणखी ३९ किलो गोमांस सापडले. ज्याची किंमत ७ हजार ८०० रुपये एवढी आहे. चौकशीत तो गोमांस विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले असून, आधी पळालेल्या आरोपींशी त्याचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

अब्दुल माजिद अब्दुल सत्तार (३५) रा. मोमीनपुरा असे या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी गोमांस व मोपेड दुचाकी असा एकूण २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण १३० किलोहून अधिक गोमांस जप्त करण्यात आले आहे. जप्त मालाचे नमुने प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित गोमांस नष्ट करण्यात आले आहे .

या प्रकरणी फिर्यादी विशाल पांडुरंग दुधबळे (वय ३९) यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जत्रा मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे अवशेष आढळून आल्यानंतर गोवंशाच्या कत्तलीचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या प्रकरणात शासकीय स्तरावर गंभीर दखल घेत ठाणेदारांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त झाल्याने शहरात गोवंश कत्तलीचे जाळे अजूनही सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

No comments:

Powered by Blogger.