Latest News

Latest News
Loading...

महात्मा फुले जयंतीनिमित्त वणीत भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन


प्रशांत चंदनखेडे वणी :-

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात सामाजिक बांधिलकी जपणारा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माळी बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या वतीने शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक बसस्टँडसमोरील संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

समाजातील सामाजिक समता, शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुवार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाळे राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून कवि विनोदकुमार आदे कार्यभार सांभाळणार आहेत.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, माजी सीडीपीओ सुरेखा तुराणकर, उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार, माजी सभापती संजय पिपळशेंडे, सरपंच दीपक मत्ते तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते समीर लेनगुळे यांची उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात येणार असून, त्यामध्ये शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, ‘दलित मित्र’ पुरस्कार प्राप्त रफिक रंगरेज, माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे, सुप्रसिद्ध नकलाकार डॉ. दिलीप अलोने, व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त राम झिले, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, रुग्ण सेवक व सामाजिक प्रतिनिधी रवींद्र कांबळे, तसेच बंडू वाढई व हर्षल शेंडे यांचा समावेश आहे.

तसेच यावेळी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून शासकीय सेवेत रुजू झालेल्या माळी समाजातील गुणवंत तरुण-तरुणी, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाळे, उपाध्यक्ष महेश चौधरी व सचिव भास्कर वाढई यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.