Latest News

Latest News
Loading...

झरी-मुकुटबन-माथार्जुनला अद्यावत प्रवासी निवारे; आमदार देरकरांच्या पाठपुराव्याला ६० लाखांच्या निधीसह मोठे यश


प्रशांत चंदनखेडे वणी :-

ग्रामीण भागातील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधत आमदार संजय देरकर यांनी झरी तालुक्यात एक महत्त्वपूर्ण विकासकाम साध्य केले आहे. झरी, मुकुटबन आणि माथार्जुन येथे अद्यावत प्रवासी निवारे उभारण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांप्रमाणे एकूण ६० लाख रुपयांच्या निधीस शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी व कामगार वर्गाला बसची प्रतीक्षा करताना ऊन, वारा आणि पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी साधा निवाऱ्याचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार देरकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून अमरावती विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी मंजूर विशेष निधीतून या तीन महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या प्रवासी निवाऱ्यांचे स्वरूप अत्याधुनिक असणार असून प्रत्येक ठिकाणी सुमारे ३० फूट बाय ८ फूट आकाराचे भव्य बस शेल्टर उभारण्यात येणार आहे.

या निवाऱ्यांमध्ये प्रवाशांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच विद्युतीकरणाची सोय करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत लोखंडी संरचना व दर्जेदार छप्पराचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात आमदार संजय देरकर यांनी सांगितले की, “प्रवाशांना भेडसावणारी अडचण दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. मंजुरी मिळालेल्या या कामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. विकासकामांचा हा वेग पुढेही कायम ठेवणार आहे.”

दरम्यान, या निर्णयामुळे झरी तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


No comments:

Powered by Blogger.