Latest News

Latest News
Loading...

ऑनलाईन ओळख, प्रेम… आणि शेवटी ब्लॅकमेल; दोन वर्षांच्या प्रेमकहाणीचा धक्कादायक शेवट


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मोबाईलच्या स्क्रीनवर झालेली एक साधी ओळख… काही दिवसांतच गप्पा, मग भावना… आणि त्यानंतर प्रेमाच्या नावाखाली वाढत गेलेले संबंध. पण या प्रेमकथेचा शेवट मात्र थरकाप उडवणारा ठरला. दोन वर्षे सहवासात राहिल्यानंतर नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलेल्या महिलेवर प्रियकराने दबाव आणत आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वणी येथील ३६ वर्षीय विवाहित व दोन मुलांची आई असलेल्या महिलेची सोशल मीडियावरून पुसद येथील तुषार गजानन काकडे (वय ३०) याच्याशी ओळख झाली. सुरुवातीला सहज सुरू झालेला संवाद हळूहळू भावनिक गुंतवणुकीत बदलला. ऑनलाईन जगात निर्माण झालेली जवळीक प्रत्यक्ष भेटीपर्यंत पोहोचली आणि या नात्याने प्रेमाचे रूप घेतले.

भेटीगाठी वाढत गेल्या तशी या नात्याची सीमाही ओलांडली गेली. १५ ऑक्टोबर २०२४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत एकमेकांच्या सहवासात राहिलेल्या दोघांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दोन वर्षांपासून त्यांच्यात असलेले संबंध व नातं तोडण्याचा महिलेने अचानक निर्णय घेतला—आणि इथूनच या कथेला गुन्हेगारीची किनार लाभली.

प्रेयसीच्या निर्णयाने अस्वस्थ झालेल्या प्रियकराने तिला धमकावण्यास सुरुवात केली. खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला पुन्हा नात्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला. एवढेच नव्हे, तर “तू नातं तोडलंस तर मी आत्महत्या करून तुझं नाव लिहीन” अशी भीतीदायक धमकी देऊन तो तिचा मानसिक छळ करू लागला.

या सततच्या दबावामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर धाडस दाखवत २७ एप्रिलला वणी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून कारवाईला सुरुवात केली. आरोपी प्रियकरावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(२)(३) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला पुसद येथून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

या घटनेने सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या नात्यांचा धोकादायक पैलू पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. आभासी जगातील जवळीक वास्तवात किती महागात पडू शकते, याचा हा जिवंत नमुना ठरला आहे. सोशल मीडियावरून झालेली ओळख व नंतर होणारी भावनांची गुंफण कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकते, याची परत एकदा प्रचिती आली आहे. तज्ज्ञांच्या मते, वैयक्तिक माहिती, फोटो किंवा खासगी क्षण शेअर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे हीच अशा प्रकारांपासून बचावाची पहिली पायरी आहे.

No comments:

Powered by Blogger.