वणी रेल्वे सायडिंगवरील कोळसा हेरफेर प्रकरणात वेकोलिची मोठी कारवाई, दोन कर्मचारी निलंबित तर कोळसा वाहतूक कंपनी ब्लॅकलिस्ट
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वेकोलिच्या वणी रेल्वे सायडिंगवरील कोळसा हेरफेर प्रकरणात वेकोलि प्रशासनाने वेळाने का होईना मोठी कारवाई करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या सुरक्षा प्रमुख व डंपमॅन यांना निलंबित केले. तर तीन सुरक्षा रक्षक, एक डंपमॅन व एका काटा बाबुला (वे-ब्रिज ऑपरेटर) कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच संबंधित कोळसा वाहतूक कंपनीवरही एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. या धडक कारवाईने वेकोलि वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वेकोलिच्या उकणी कोळसाखाणीतून वणी रेल्वे सायडिंगवर आणल्या जाणाऱ्या कोळशाची चोरी करून त्याऐवजी बनावट कोळसा सायडिंगवर खाली करण्यात आल्याचा प्रकार डोळ्यासमोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
वेकोलिच्या कोळसाखाणीतून वीज प्रकल्पांच्या डिओवर कोळशाची उचल करून तो कोळसा वणी रेल्वे सायडिंगवर आणला जातो. वेकोलिच्या सर्व अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीला कोळसा वाहतुकीचे कंत्राट दिले जाते. रेल्वे सायडिंगवर साठविण्यात येणारा कोळसा नंतर मालवाहू रेल्वेने वीजप्रकल्पांना पाठविला जातो. मात्र कोळसा वाहतुकीचे कंत्राट मिळालेल्या ट्रान्सपोर्ट कंपन्या कोळसा वाहतुकीत पारदर्शकता बाळगत नसल्याचे चित्र समोर आले आहे. उकणी कोळसाखाणीतून वणी रेल्वे सायडिंगवर कोळसा वाहतुकीचे कंत्राट मिळालेल्या मे. कृष्णा इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (विशाल लॉजिस्टिक) या कोल ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रक कोळसा चोरी करीत असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.
उकणी कोळसाखाणीतून वणी रेल्वे सायडिंगवर कोळसा भरून येणारे ट्रक कोलडेपोवर खाली होत असल्याच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले होते. कोळसाखाणीतून ट्रकांमध्ये भरून आणलेला उच्च दर्जाचा कोळसा लालपुलिया परिसरातील कोलडेपोवर खाली करून गिट्टी व काळी चुरी मिश्रित बनावट कोळसा रेल्वे सायडिंगवर खाली करण्यात येत होता. हा गंभीर प्रकार एकदा नाही तर अनेकदा उघडकीस आला. पण थातुर मातुर कारवाई करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.
फेब्रुवारी महिन्यातही या कोल ट्रान्सपोर्ट कंपनीचे काळे कारनामे उघड झाले होते. कोळसाखाणीतून सायडिंगवर आणण्यात येणाऱ्या कोळशात मोठी अफरातफर झाल्याचे उघडकीस आले होते. मात्र त्यावेळी निव्वळ ट्रक चालकांवर कारवाई करून या गंभीर प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोळसा चोरीला पाठबळ देणारे पडद्याआडच राहिले. मुख्य सूत्रधारांना सोडून त्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करण्यात आल्याने त्यावेळी वेकोलि प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते.
कोळसा तस्करीचा हा काळ धंदा अनेक दिवसांपासून सुरु असल्याची ओरड होऊनही वेकोलिने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. एवढेच नाही तर लालपुलिया परिसरात चोरीच्या कोळशाची गंगा वाहत असल्याच्या चर्चेने रान उठविले असतांनाही वेकोलिने सुरक्षेच्या कुठल्याही ठोक उपाययोजना केल्या नाही. वेकोलि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचे आता चांगलेच पडसाद उमटले आहेत.
मे. कृष्णा इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कोळसा वाहतूक कंपनीचे ट्रक कोळसा चोरी करीत असल्याचे वारंवार समोर येऊनही कंपनीवर किंवा चोरीला पाठबळ देणाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई झाली नव्हती. निव्वळ चौकशी समिती नेमली असल्याचे सांगण्यात आले. मात्र याच कंपनीचा एक ट्रक (MH ४० CD ७६७५) २० एप्रिलला बनावट कोळसा खाली करतांना रंगेहात सापडल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेलं वेकोलि प्रशासन खडबडून जागं झालं.
या कोळसा हेरफेर प्रकरणाची नंतर वेकोलि प्रशासनाने गंभीर दखल घेत थेट कारवाई केली. कोळसा वाहतूक कंपनीवर एक वर्षांसाठी बंदी घालतानाच कर्तव्यात कसूर करणाऱ्या डंपमॅन प्रसाद पिंपळशेंडे आणि सुरक्षा प्रमुख रशीद अहेमद यांना तात्काळ निलंबित केले. तर सायडिंगवरील तीन सुरक्षा रक्षक, एक डंपमॅन आणि एका काटा बाबूला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच मे.कृष्णा इंफ्रा. प्रा. लि. कंपनीचे सुरवाईजर गौतम सिंग आणि संबंधित ट्रक चालक मुक्कदर हुसैन यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रारही करण्यात आली आहे. हा गंभीर प्रकार रॅकमध्ये कोळसा लोड करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत. या कारवाईने कोळसा तस्करांचे धाबे दणाणले असून वेकोलि वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

No comments: