Latest News

Latest News
Loading...

मोक्षधाम प्रवेशद्वाराजवळील नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह

 

प्रशांत चंदनखेडे वणी :- 

शहरातील मोक्षधाम प्रवेशद्वाराजवळील नाल्यात एक इसम मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवार २९ एप्रिलला सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मारोती नामदेव पिपराडे वय अंदाजे ५० वर्षे असे मृतकाचे नाव आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. 

मूळचे वणी तालुक्यातील मानकी येथील रहिवाशी असलेले मारोती पिपराडे हे हल्ली शहरातील गुरुनगर परिसरात राहत होते. सकाळी ते मानकी येथे जाण्यास निघाल्याचे सांगण्यात येते. मात्र मोक्षधाम प्रवेशद्वाराजवळील नाल्यात त्यांचा मृतदेहच आढळून आला. मोक्षधाम परिसरातील नागरिकांना नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाल्यातून मृतदेह बाहेर काढत मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरून त्याची ओळख पटली. नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. गावाकडे जाण्यासाठी निघालेले मारोती पिपराडे हे नाल्यात कसे काय पडले व त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

मारोती पिपराडे यांच्या अनपेक्षित मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधारवड हिरावला गेला आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.


 

No comments:

Powered by Blogger.