Latest News

Latest News
Loading...

साखरपुड्यानंतर वराकडील मंडळींनी बदलले रंग; ‘एसी हॉल’च्या मागणीवरून मोडले लग्न


प्रशांत चंदनखेडे वणी :-

साखरपुडा पार पडल्यानंतर अचानक वर पक्षाने थाटामाटात लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवत अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी करून वधू पक्षाशी कुठलीही चर्चा न करता थेट लग्नच मोडल्याचे जाहीर केल्याने नववधू व तिच्या कुटुंबावर अक्षरशः चिंतेचा पहाड कोसळला. लग्न काही दिवसांवर असतांना नवऱ्या मुलाकडून अवास्तव मागणी करण्यात आल्याने वधू कुटुंब चांगलंच कोंडीत सापडलं. मात्र त्याउपरांतही चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यानंतर वर पक्षाने लग्न मोडल्याचा फर्मान बजाविल्याने वधू पक्षाचा प्रचंड हिरमोड झाला. साखरपुडा व लग्नाच्या तयारीवर मोठा खर्च झाल्यानंतर वर पक्षाने लग्न मोडल्याने नववधू व तिचे कुटुंबीय कमालीचे संतापले. शेवटी लग्नाचे स्वप्न रंगवून असलेल्या मुलीचा स्वप्नभंग झाल्याने तिने नवरा मुलगा, त्याचे कुटुंबीय व नातलगांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. हा गंभीर प्रकार मारेगाव तालुक्यात उघडकीस आला. या घटनेने हुंड्याच्या मागणीचा नवा व सूक्ष्म चेहरा समोर आणला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या राखी (नाव बदलेले) या तरुणीचे यवतमाळ येथील मयुर गिरी याच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न जुळले होते. त्यानंतर १ मार्चला वणी येथे साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडून दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले. विशेष म्हणजे, लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती. तसेच लग्नाची बोलणी करतांना वर पक्षाची कोणतीही मागणी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र, ४ मार्चच्या रात्री नवऱ्या मुलाने थेट तरुणीशी संपर्क साधत लग्न ‘एसी हॉलमध्येच’ करण्याची अट घालत ही मागणी कुटुंबीयांकडे पोहोचवण्याचा दबाव टाकला. मात्र नवऱ्या मुलीने तुम्ही स्वतः कुटुंबियांशी बोला असे म्हणताच मुलाने फोन कट केला. नंतर मुलीने नवऱ्या मुलाचा हा प्रस्ताव वडिलांसमोर मांडला. या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी मुलीकडील कुटुंबीयांनी पुढाकार घेतला असता, मुलाने कुठलाही प्रतिसाद न देता उलट “लग्न मोडले असे समजा” असा एकतर्फी निर्णय जाहीर केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे तरुणी व तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला असून, अखेर त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत तरुणीने पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयुर सुरेश गिरी (३३), त्याचे वडील सुरेश भाउगिर गिरी (५५), नातेवाईक नामदेव भाउगिर गिरी (६७) सर्व रा. पिंपळगाव रोड, यवतमाळ व सतिश दिवाकर गिरी (४५) रा. चांदुर रेल्वे जि. अमरावती यांच्याविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम १९६१ तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

साखरपुड्यानंतर वाढणाऱ्या अशा अटी-शर्ती, आर्थिक अपेक्षा आणि त्यातून लग्न मोडण्याचे प्रकार हे समाजातील बदलत्या पण धोकादायक प्रवृत्तीचे द्योतक मानले जात आहेत. उघडपणे हुंडा मागण्याऐवजी ‘सोयी-सुविधांच्या’ नावाखाली दबाव टाकण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता यांची नितांत गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

या प्रकरणाचा पुढील ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पो.शि. संभा लेनगुरे करीत आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.


No comments:

Powered by Blogger.