Latest News

Latest News
Loading...

बापरे... विजेच्या खांबावरून १२ किमी लांब अॅल्युमिनियम तार चोरट्यांनी नेला कापून

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरात रस्त्यालगत असलेल्या वीज खांबांवर नव्याने विद्युत तारा (वीज जोडणी) ओढण्याचे काम सुरु असून वीज खांबावर नव्याने टाकण्यात आलेला अॅल्युमिनियमचा तारच अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १२ किलोमीटर लांबीचा तार लंपास झाल्याने वीज विभागासह परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या वतीने वेगाव येथे ११ के.व्ही. वीज लाईनचे (वीज जोडणी) काम सुरू होते. या अंतर्गत रस्त्यालगतच्या विजेच्या खांबांवर अॅल्युमिनियम तार टाकण्यात आला होता. मात्र २६ मार्चपर्यंत सुरळीत असलेले हे काम दुसऱ्याच दिवशी चोरीच्या प्रकारामुळे विस्कळीत झाले.

२७ मार्च रोजी सकाळी कामाची पाहणी केली असता, अज्ञात चोरट्यांनी वीज खांबांवर लावलेला सुमारे १२ किलोमीटर लांबीचा, अंदाजे १८ क्विंटल वजनाचा अॅल्युमिनियम तार कापून नेल्याचे निदर्शनास आले. या चोरीत सुमारे २ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात तार कापून नेण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनेनंतर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र कोणताही ठोस सुगावा लागला नाही.

या प्रकरणी पॉलिकॅब इंडिया लिमिटेड कंपनीचे वायरमन संतोष रामगोपाल शर्मा (३८) रा. हुसैनपूर जि. मुरैन (मध्यप्रदेश) ह.मु. मारेगाव यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. सार्वजनिक सुविधांवरच डल्ला मारणाऱ्या चोरट्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



No comments:

Powered by Blogger.