प्रशांत चंदनखेडे वणी :-
पत्नीशी नेहमी वाद घालत तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार मारेगाव येथे उघडकीस आला आहे. विनाकारण वाद उपस्थित करून अनेक वर्षांपासून पती कडून होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने शेवटी पत्नीने पोलिसांत तक्रार नोंदविली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने (वय ३४, रा. मारेगाव, सध्या लोहारा, यवतमाळ) मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह सन २०१० मध्ये मारेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे राहणाऱ्या अमोल (३७) याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला. विवाहानंतर सुरुवातीचे तीन महिने सर्व काही सुरळीत होते; मात्र त्यानंतर पतीकडून किरकोळ कारणांवरून वारंवार वाद, शिवीगाळ व मारहाण सुरू झाली.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, पती दारूचा व्यसनाधीन असून तो घरखर्चासाठी पैसे देण्यासही टाळाटाळ करायचा. तसेच तो दोन मुलांबाबतही अपमानास्पद वक्तव्य करत त्यांना नाकारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, पतीचे एका महिलेसोबत संबंध असल्याचे समोर आल्यानंतर त्या महिलेशी संबंध ठेवण्यास विरोध केल्याच्या करणावरूनही वेळोवेळी वाद निर्माण होऊन मारहाण व मानसिक छळ वाढल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी आरोपी पती हा संबंधित महिलेसोबत घर सोडून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. लग्नाची पत्नी असतांना विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीला जाब विचारण्यास गेलेल्या पत्नीलाच आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी पत्नी ही मुलांना घेऊन यवतमाळ येथे माहेरी राहायला गेली. दरम्यान, ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी आरोपी पतीने पत्नीला फोन केला व मुलांच्या परीक्षेकरिता मारेगावला आली तर तुला सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पत्नीने सरळ पोलिसांत धाव घेत पतीपासून तिला व तिच्या मुलांना धोका असल्याची रीतसर तक्रार नोंदविली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंतेची भावना व्यक्त होत आहे.

No comments: