शहरालगत असलेल्या चिखलगाव (यवतमाळ रोड) परिसरात वणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीची विस्तीर्ण जागा असून या जागेवर लावण्यात आलेल्या बांबू व सुबाभळीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमारे ९८ हजार ५०० रुपये किंमतीची झाडे अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असून या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद अरुण खानझोडे (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा प्रकार समोर आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चिखलगाव येथील ३२ एकर जागेवर सहा वर्षांपूर्वी बांबू व सुबाभुळ झाडांची लागवड करण्यात आली होती. ही झाडे संस्थेच्या मालकीची असून परिसराच्या देखभालीसाठी तसेच भविष्यातील उपयोगासाठी जपली जात होती.
दरम्यान, १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास प्राचार्य खानझोडे हे संबंधित जागेचे मोजमाप करण्यासाठी तेथे गेले असता, त्यांना त्याठिकाणी असलेल्या अंदाजे १४ बांबूच्या झुडुपांतील सुमारे २१० बांबू (प्रत्येकी अंदाजे ३५० रुपये) तसेच १० सुबाभुळ झाडे (प्रत्येकी अंदाजे २,५०० रुपये) अज्ञात व्यक्तींनी कापून चोरून नेल्याचे आढळून आले. एकूण ९८,५०० रुपये किंमतीची झाडे या ठिकाणावरून चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेमुळे शिक्षण संस्थेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संस्थेच्या जागेवरील झाडेही चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. अज्ञात आरोपींनी नियोजनपूर्वक झाडे कापून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी नोंदविण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपस ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निलकमल भोसले करीत आहेत.

No comments: