Latest News

Latest News
Loading...

“माझ्याशीच बोल, भेट आणि लग्न कर नाही तर तुझी बदनामी करेन” — तरुणीवर दबाव टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी :-

“माझ्याशीच बोल, माझ्यासोबतच लग्न कर… नाहीतर तुझे फोटो व्हायरल करून बदनामी करीन” अशा धमक्या देत एका तरुणीवर वाईट उद्देशातून भेटण्यासाठी सतत दबाव टाकणाऱ्या तरुणावर तरुणीच्या तक्रारीवरून पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना २६ मार्चला उघडकीस आली. या प्रकारामुळे तरुणीला तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रश्मी (नाव बदलेले) वय २२ वर्षे ही तरुणी धानोरा येथे पोस्टमास्तर म्हणून कार्यरत असून ती सध्या लिंगटी येथे वास्तव्यास आहे. काही वर्षांपूर्वी तिची ओळख अमित संजय आडे (वय २७, रा. उमरसरा, यवतमाळ) या तरुणाशी झाली. परंतु नोकरी लागल्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क तोडला. मात्र आरोपी हा मोबाईलवरून तिच्याशी सतत संपर्क साधायचा. तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा. तरुणीने संबंध तोडल्यानंतरही त्याने तिला सतत फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले.

“तू माझ्याशीच बोलत जा, दुसऱ्यांशी बोललीस तर तुझे फोटो व्हायरल करीन,” अशी धमकी देत आरोपीने तिच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर एका वेगळ्या उद्देशाने त्याने तिच्याकडे वारंवार भेटण्याचा आग्रह धरला. मात्र तरुणीने त्याला भेटण्याकरिता स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपी अधिकच आक्रमक झाला व त्याने तिची बदनामी करण्याचा डाव आखला.

२५ मार्च रोजी आरोपीने पुन्हा तिला फोन करून लग्नासाठी दबाव टाकला. मात्र नकार मिळताच त्याने तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. त्याने तरुणीच्या मित्र-मैत्रिणींनाही फोटो पाठवून तिच्याबद्दल भ्रामक व चुकीची माहिती पसरविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणी मानसिकदृष्ट्या हादरली.

दरम्यान सततच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर पाटण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमित आडे या आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम ७८(२), ७५(१), ३५६, ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे वाढते प्रकार पुन्हा एकदा समोर आले असून अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.