तालुक्यातील राजूर कॉलरी परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कुटुंबासह घरी झोपलेली अल्पवयीन मुलगी (वय १७ वर्षे ५ महिने) अचानक घरून बेपत्ता झाली. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आईला जाग आली असता मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर कुटुंबीयांनी घर परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही.
मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात आरोपी विरोधात तक्रार नोंदविली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत शोधमोहीम सुरू केली आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

No comments: