प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील मुर्धोनी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केले. एका तरुणावर तिघांनी हल्ला चढवून बेदम मारहाण केली. ही घटना ३० मार्चच्या रात्री घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित राजू दुबे (वय २८, रा. मुर्धोनी) हे ३० मार्च रोजी रात्री गावात असताना गावातीलच काही युवकांनी त्यांच्याशी वाद घातला. हा वाद थांबत नाही तोच रात्री उशिरा पुन्हा वाद उफाळून आला आणि परिस्थिती बिघडली.
रात्री १० वाजताच्या सुमारास प्रविण पोटे, जगन्नाथ पोटे आणि अभिनव कापसे (सर्व रा. मुर्धोनी) यांनी अमित दुबे यांना घेरून जाब विचारला आणि अचानक हल्ला चढवला. तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी जगन्नाथ पोटे याने हातातील कड्याने दुबे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यातून रक्तस्राव सुरू झाला आणि ते खाली कोसळले.
आरोपींनी त्यांना खाली पाडूनही मारहाण सुरूच ठेवली. यात दुबे यांच्या पायालाही दुखापत झाली. अखेर नातेवाईकांनी धाव घेऊन हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
जखमी अवस्थेत दुबे यांनी वणी पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या मारहाणीबाबत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
या घटनेमुळे किरकोळ कारणावरून वाढणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

No comments: