जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्याच्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोठी कारवाई करत मारेगाव येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पथकाने सोन्याचांदीचे दागिने असा तब्बल २१ लाख ३७ हजार ७७१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मारेगाव येथील रहिवासी सुशील जगेंवार यांनी ७ एप्रिल रोजी त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यावरून गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या घरफोडीत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची आणखी कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी चोरी केलेले दागिने पुसद येथील नथ्थु कुरकुटे व दत्ता कुरकुटे यांच्या माध्यमातून उमरखेड येथील सराफा व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले.
या धाग्याला धरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वणी-पांढरकवडा पथकाने तातडीने पुसद येथे छापा टाकत तेथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या मदतीने सराफा व्यावसायिकाकडून विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. पथकाने जप्त केलेल्या ऐवजाची एकूण किंमत २१.३७ लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणात दत्ता सटवाजी कुरकुटे (रा. नागवाडी, ता. पुसद) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मारेगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे, स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर, धिरज बांडे, पोउपनि धनराज हाके, शरद लोहकर, मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदूरकर तथा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान, घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई दिलासा देणारी ठरली असून, गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी अशाच कठोर कारवायांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments: