तालुक्यातील मोहर्ली गावात दोन मद्यधुंद इसमांनी अक्षरशः दहशत माजवत महिलेसह एका कुटुंबावर हल्ला चढविल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शिवीगाळ, मारहाण, धमक्या आणि घरात घुसून तोडफोड केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी रंजना शंकर सिडाम (वय ३४, रा. मोहर्ली) यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घराशेजारी राहणारे गणेश आनंद कुमरे (वय २२) व कैलास मंगल मडावी (वय ४०) हे दोघेही दारूचे प्रचंड व्यसनी असून दारूच्या नशेत शिवीगाळ करून ते नेहमी परिसरात वाद घालत असतात. दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रंजना व त्यांचे पती शेजाऱ्यांकडे जात असताना आरोपींनी त्यांना अडवून विनाकारण ढकलाढकली सुरू केली.
आरोपी हे पतीशी वाद घालत असतांना रंजना यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता दारुड्यांनी रंजना यांनाही लक्ष्य करत थापड-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रंजना यांच्या कानाजवळ दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीच्या घरासमोर पुन्हा धिंगाणा घालत शिवीगाळ केली, घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून तोडफोड केली आणि “बघून घेण्याची” धमकी दिली.
दरम्यान, मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या शेजाऱ्यांनाही आरोपींनी दमदाटी केल्याने गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वारंवार अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रंजना सिडाम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ११५(२), ३५१ (२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: