शहरात अल्पवयीन मुलींशी छेडछाडीच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना बेलदारपुरा परिसरात घडली. घराच्या माडीवर खेळत असलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी राजेंद्र गुलाब चरडे (वय ५६) याला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
दुसरी घटना निर्गुडा नदी रोड परिसरात घडली असून, ११ वर्षीय मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी एकनाथ रोहणकर (वय ५२) याला ताब्यात घेण्यात आले. मुलगी घराच्या पोर्चमध्ये खेळत असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली असून पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. प्रियंका चौधरी व पथक करत आहे. लहान मुलींवर वाईट नजर ठेवणाऱ्या या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.
दरम्यान, चिमुकल्या मुलींशी असभ्य वर्तवणुकीच्या घडलेल्या सलग दोन घटनांमुळे शहरात बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकांनी आपल्या छोट्या व वयात येणाऱ्या मुलींशी संवाद वाढवून त्यांना ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ याबाबत योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments: