प्रशांत चंदनखेडे वणी :-
सामाजिक वास्तवाच्या धगधगत्या प्रश्नांना स्पर्श करत, मनाचा ठाव घेणारी कलाकृती क्वचितच समोर येते. अशाच प्रकारची अंतर्मुख करणारी अनुभूती देणारी ‘माझ्या घरात कोणी तरी आहे’ ही शॉर्ट फिल्म (लघुपट) सध्या युट्यूबवर प्रदर्शित झाली असून, त्यात हुरहुनरी कलावंत दशरथ लोणारे (बुद्धघोष) यांनी साकारलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
या लघुपटातून बेरोजगारीचा वाढता विळखा आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या एका युवकाची कथा या लघुपटात उलगडते. जगण्याच्या विवंचनेत गुरफटलेल्या या पात्रासमोर त्याचेच प्रतिबिंब उभे ठाकते आणि तो एकटाच नाही, तर समाजातील अनेकजण अशाच परिस्थितीत जगत असल्याची जाणीव करून देते. या मानसिक ताणातून निर्माण होणारी भीती, अस्वस्थता आणि वास्तवापासून पळ काढण्याची धडपड दशरथ लोणारे यांनी अत्यंत जिवंतपणे साकारली आहे. “माझ्या घरात कोणी तरी आहे” असा भीतीदायक उद्गार या लघुपटाचा केंद्रबिंदू ठरतो.
मूळचे बल्लारशहा येथील रहिवासी असलेले दशरथ लोणारे गेल्या काही वर्षांपासून वणी तालुक्यात स्थायिक झाले आहेत. प्रबोधनकार, गायक, वक्ते आणि नकलाकार म्हणून ओळख असलेल्या लोणारे यांनी आता अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी छाप उमटवली आहे. सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग, विविध सेवाभावी उपक्रम आणि तरुणांच्या प्रश्नांशी असलेली त्यांची बांधिलकी यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक बहुआयामी ठरते.
प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले असून, कलाक्षेत्रातील त्यांचा प्रवास सातत्याने समृद्ध होत आहे. दिग्दर्शक चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा लघुपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
‘माझ्या घरात कोणी तरी आहे’ या लघुपटातून बेरोजगार युवकांची अस्वस्थ वास्तवता, त्यांच्या मनातील भीती आणि समाजातील विषमता यांचे अचूक चित्रण झाले आहे. दशरथ लोणारे यांच्या कसदार अभिनयामुळे ही कथा केवळ पडद्यावरच न राहता थेट प्रेक्षकांच्या मनात घर करते. त्यांच्या या अभिनयाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, एक सामाजिक जाणिवा जागृत करणारा कलाकार म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक होत आहे.




No comments: