Latest News

Latest News
Loading...

‘मागेल त्याला पांदण रस्ता’ : नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार चिखलातून मुक्तीची वाट


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वर्षानुवर्षे चिखलमय पायवाटांवरून शेतीमाल वाहून नेण्याची कसरत करणाऱ्या बळीराजासाठी अखेर दिलासादायक पाऊल उचलले जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘मागेल त्याला पांदण रस्ता’ या धोरणाअंतर्गत प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असून, या उपक्रमाला आमदार संजय देरकर यांच्या प्रयत्नातून गती मिळाल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेती वाहतुकीचे चित्र बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांकडे अनेक वर्षे केवळ आश्वासनांच्या पातळीवर पाहिले गेले. परिणामी, पावसाळ्यात चिखलातून वाट काढत शेतमाल ने-आण करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित खदाणीतील ओबी (Over Burden) चा वापर करून कमी खर्चात टिकाऊ पांदण रस्ते उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाच पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नुकतीच उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. कामाचा वेग आणि दर्जा यावर समाधान व्यक्त करण्यात आले.

सदर उपक्रम केवळ प्रारंभिक टप्प्यावर असला तरी भविष्यात संपूर्ण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागात विकासाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शेतीमाल वाहतुकीसाठी सुलभता निर्माण होऊन उत्पादन खर्चात बचत आणि वेळेची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

No comments:

Powered by Blogger.