शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातून पैसे काढल्यानंतर काही वेळातच दुचाकीच्या डिकीतून तब्बल १ लाख रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना भालर परिसरातील तरुणासोबत घडली आहे.
भालर क्वार्टर येथे राहणारे अजय भोजराज टोंगे (वय २५) हे खासगी कंपनीत नोकरी करतात. गुरुवारी (दि. २३ एप्रिल) सकाळी सुमारे ११.३० वाजता ते वडीलांसोबत मच्छीमार्केटजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत गेले होते. बँकेतून त्यांनी १ लाख ५० हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी त्यांच्या मोटारसायकल (MH29 AZ 6917) च्या डिकीत ठेवून डिकी लॉक केली.
त्यानंतर हे दोघेही बापलेक भारतमाता चौकातील धान्य दुकानात खरेदीसाठी गेले. काही वेळाने ते परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकलच्या डिक्कीचे लॉक उघडलेले दिसले. डिक्की तपासली असता त्यामधील १ लाख ५० हजारांपैकी ५० हजार रुपये शिल्लक होते, तर १ लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले.
भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणी अजय टोंगे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावे, वाहनात रोख रक्कम ठेवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

No comments: