प्रशांत चंदनखेडे वणी :
गोदावरी अर्बन वर्धा शाखेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वणी शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्यवस्थापक विजय मोडक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वणी शाखेने १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्यमंत्री तथा पालकमंत्री (वर्धा, नांदेड) पंकज भोयर हे उपस्थित होते. तर वर्धा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुधिर पांगुळ कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगरसेवक सचिन होले, उपसरपंच सचिन खोंसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेडच्या ज्या शाखांनी १०० कोटींचा टप्पा गाठला त्या सर्व शाखा व्यवस्थापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात वणी शाखेचे व्यवस्थापक विजय मोडक यांचाही समावेश आहे. विजय मोडक यांनी वणी शाखेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ठेवी व गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांच्या प्रभावी जनसंपर्क कौशल्यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ झाला असून शाखेच्या व्यवसायवाढीस चालना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाखेने अल्पावधीतच भक्कम प्रगती साधत १०० कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठला.
शाखेच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षीय मंडळाने त्यांना सन्मानित केले. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते त्यांचा हा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे मोडक यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, हा सन्मान संपूर्ण शाखा कर्मचारी व ठेवीदारांचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या यशाबद्दल गोदावरी अर्बनचे संचालक मंडळ, पदाधिकारी, सभासद, ठेवीदार, कर्मचारी तसेच प्रतिनिधी व हितचिंतकांनी वणी शाखेचे अभिनंदन केले आहे.
या यशामुळे वणी शाखेची ओळख अधिक भक्कम झाली असून, विजय मोडक यांच्या सन्मानामुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments: