परिवर्तनवादी विचारधारेवर आधारित ‘पेटला वणवा क्रांतीचा’ हा सामाजिक चित्रपट आता चित्रपटगृहांच्या पलीकडे जाऊन थेट गावोगावी, शहरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये दाखविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. १ मे २०२६ पासून या विशेष प्रदर्शन मालिकेला सुरुवात होणार असून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत परिवर्तनाचा संदेश पोहोचविण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे.
१२ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग चार महिने म्हणजेच १५ एप्रिल २०२६ पर्यंत चित्रपटगृहांमध्ये याचे प्रदर्शन सुरू होते. तथापि, ग्रामीण भागातील अनेकांना अंतर, वेळेची अडचण, तिकीट दर आणि कामाच्या व्यापामुळे हा चित्रपट पाहता आला नाही.
याच पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमने नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बुद्ध, कबीर, शिवराय, शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित हा चित्रपट आता गावागावांत, विहारांमध्ये, सांस्कृतिक भवनांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष स्क्रीनिंगद्वारे दाखविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा आयोजकांकडे उपलब्ध असून, लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमामुळे श्रमजीवी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. सामाजिक परिवर्तनाचा विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचावा, यासाठी नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ७५०७५०७४२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments: