Latest News

Latest News
Loading...

कोंबडीच्या पैशावरून वाद; विट-दगड हल्ल्यात दोघे जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट दगड-विटाने हल्ला करण्यापर्यंत पोहचला. कोंबडीच्या पैशावरून झालेल्या वादाचे रूपांतर दगड-विटाने हल्ला करण्यात झाले. एका तरुणाने दारूच्या नशेत विट व दगडाने हल्ला करत दोघांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शिरपूर येथील हनुमान नगर परिसरात मंगळवारी (दि. 31 मार्च) सायंकाळी घडली.

याप्रकरणी सुनिल भाऊराव गोरे (वय 43) यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते अब्दुल सलाम शेख यांच्या पानठेला व चिकन सेंटरवर रोजमजुरीचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी ते पानठेल्याजवळ बसले असताना आरोपी जगन्नाथ रामदास आत्राम (वय 31, रा. हनुमान नगर) हा दारूच्या नशेत तेथे आला आणि त्याने चिकनच्या दुकानातून कोंबडी मागितली. सुनिल गोरे यांनी त्याला दोन किलो वजनाची कोंबडी दिली, मात्र पैसे नंतर देतो असे सांगून आरोपी तेथून निघून गेला.

काही वेळानंतर आरोपी पुन्हा परत आला आणि “कोंबडी दिलीच नाही” असे म्हणत त्याने पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांत वाद झाला आणि आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. संतापाच्या भरात जगन्नाथ आत्राम याने हातातील विट सुनिल गोरे यांच्या दिशेने भिरकावली, मात्र ती चुकून बाजूला उभ्या असलेल्या सतिश चॅटर्जी यांच्या डोक्याला लागली. त्यामुळे ते जखमी झाले.

दरम्यान, हा प्रकार पाहून अब्दुल सलाम शेख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात अब्दुल शेख गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले.

दारुड्या तरुणाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने शिंदोला माईन्स येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर अब्दुल शेख यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपी जगन्नाथ आत्राम याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ३५२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

No comments:

Powered by Blogger.